आयुष पद्धतींचं वैज्ञानिक प्रमाणीकरण करून कर्करोगाच्या उपचारात त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ठोस पावले उचलली जात असल्याची महत्त्वपूर्ण माहिती गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिलीये. कॅन्सरच्या उपचारात आयुर्वेद आणि आधुनिक वैद्यक यांचं एकत्रित मॉडेल उभारण्याचा प्रयत्न सुरू असून, यासाठी खोपोलीमध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स उभारलं जात आहे. येत्या पाच महिन्यांत हे केंद्र सुरु होईल असं त्यांनी स्पष्ट केलंय.
खारघरमध्ये सुरू असलेल्या “समाकलन २.० - राष्ट्रीय एकात्मिक कर्करोग उपचार परिषद” कार्यक्रमात त्यांनी ही माहिती दिली. कॅन्सर उपचार अधिक परिणामकारक आणि सर्वसमावेशक व्हावा, यासाठी आयुष प्रणाली आणि आधुनिक उपचार पद्धती यांचं एकत्रिक मॉडेल विकसित करण्यावर या परिषदेत भर देण्यात येतोय. १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी ही दोन दिवसीय परिषद आयोजित करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितलं की, कॅन्सरवर आयुर्वेद आधारित उपचार, सहाय्यक थेरपी आणि पुनर्वसन पद्धती यावर सध्या संशोधन सुरू आहे. हे संशोधन केवळ पारंपरिक ज्ञानापुरते मर्यादित न ठेवता त्याचे वैज्ञानिक मूल्यमापन करूनच पुढे नेलं जातंय. त्यामुळे उपचार पद्धतींना वैद्यकीय मान्यता मिळण्यास मदत होईल.
या उपक्रमात Tata Memorial Centre आणि All India Institute of Ayurveda यांसारख्या अग्रगण्य संस्थांचे सहकार्य घेतलं जात असल्याची माहिती आहे. या संस्थांच्या संयुक्त प्रयत्नांमधून सर्वसामान्य रुग्णांना एकाच छताखाली सर्वांगीण कॅन्रस उपचार उपलब्ध करून देण्याचं उद्दिष्ट आहे. आधुनिक उपचारांसोबत आयुष-आधारित पूरक उपचार दिल्यास रुग्णांच्या जीवनमानात सुधारणा होऊ शकते, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
कॅन्सर उपचारासाठी आयुष अंतर्गत औषध शोध आणि विकास उत्कृष्टता केंद्राच्या मार्गदर्शनाखाली ही परिषद होतेय. या संपूर्ण उपक्रमाला Ministry of AYUSH यांचा पाठिंबा आहे. या प्रकल्पासाठी भारत सरकारकडून अंदाजे ३०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहितीही देण्यात आली.
कॅन्सरसारख्या गंभीर आजारावर लढा देताना उपचार केवळ औषधांपुरते मर्यादित न ठेवता, जीवनशैली, आहार, मानसिक आधार आणि पूरक उपचार यांचा समावेश असलेली एकात्मिक पद्धत विकसित करण्याचा हा प्रयत्न असल्याचंही त्यांनी नमूद केलंय. त्यामुळे भविष्यात कॅन्सर उपचार अधिक व्यापक आणि रुग्णकेंद्री होण्याची अपेक्षा व्यक्त केली जातेय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.