मध्य रेल्वेच्या १८ ट्रेनचे तिकीटदर कमी
१ जानेवारी २०२७ पासून रेल्वे तिकीटदरात बदल होणार
सुपरफास्ट शुल्क रद्द झाल्यामुळे प्रवाशांचे तिकीटाचे पैसे वाचणार
मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. मध्य रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या १८ लांब पल्ल्यांच्या मेल आणि एक्स्प्रेसच्या तिकीटाचे दर कमी होणार आहे. १ जानेवारीपासून तिकीटाचे दर कमी करण्यात येणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना या ट्रेनमधून स्वस्तात प्रवास करता येणार आहे. मध्य रेल्वेने घेतलेल्या या निर्णयाचे प्रवाशांनी स्वागत केले. मध्य रेल्वेच्या १८ ट्रेनचा सुपरफास्ट दर्जा रद्द करण्यात येणार असल्यामुळे तिकीटाचे दर कमी होणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेने निवडक लांब पल्ल्याच्या १८ मेल-एक्स्प्रेस गाड्यांचा सुपरफास्ट दर्जा रद्द करण्याची तयारी केली आहे. १ जानेवारी २०२७ पासून या गाड्या सामान्य एक्स्प्रेस म्हणून चालवण्यात येणार आहेत. सुपरफास्ट दर्जा रद्द झाल्यामुळे प्रवाशांना तिकीटदरात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सुपरफास्ट तिकिटावर आकारला जाणारा अतिरिक्त सुपरफास्ट शुल्क यापुढे आकारला जाणार नाही त्यामुळे तिकीटाचे दर कमी होतील. परिणामी प्रवाशांच्या खिशावर येणारा ताण कमी होईल.
सीएसएमटी- हिंगोली जनशताब्दी एक्स्प्रेस, सीएसएमटी- पुणे प्रगती एक्स्प्रेस, सीएसएमटी-बनारस महानगरी एक्स्प्रेस आणि एलटीटी-अयोध्या कॅन्ट तुळशी एक्स्प्रेससह १८ गाड्यांच्या तिकीटाचे दर कमी होणार आहे. यामध्ये एलटीटी–तिरुवनंतपुरम नॉर्थ एक्स्प्रेस, एलटीटी- करमळी एक्स्प्रेस, सीएसएमटी - चेन्नई एक्स्प्रेस आणि पुणे - काझीपेट एक्स्प्रेसचाही समावेश आहे. या बदलामुळे मुंबई आणि पुणे शहराला महाराष्ट्रासह इतर राज्यांतील शहरांशी जोडणाऱ्या ८ जोड्यांमधील एकूण १८ सेवांवर परिणाम होणार आहे.
नव्या ट्रेन क्रमांकांची अंमलबजावणी १ जानेवारीपासून होणार असल्याने प्रवाशांना आरक्षण करताना नवीन क्रमांक तपासावे लागतील. प्रवाशांनी तिकीट काढताना ट्रेनचा सुधारित क्रमांक, आरक्षणाची स्थिती आणि लागू तिकीटदर यांची खात्री करून घ्यावी असा सल्ला रेल्वे प्रशासनाने दिला आहे. तसंच, मध्य रेल्वेकडून नवीन क्रमांकांची अधिकृत माहिती जाहीर झाल्यानंतर प्रवाशांनी त्यानुसार प्रवासाचे नियोजन करावे असे देखील सांगण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.