पुण्यातील मुकुंदनगर परिसरात विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाला.
हुंडा आणि सोन्याच्या मागणीसाठी शारीरिक व मानसिक छळ केल्याचा आरोप
पुण्यातील विवाहितेच्या मृत्यू प्रकरणाचा पोलीस तपास सुरू
पुण्यातील मुकुंदनगर परिसरात एका विवाहितेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. पायल अक्षय झांबरे असे मृत महिलेचे नाव असून, सासरच्या मंडळींकडून हुंडा आणि सोन्याच्या मागणीसाठी तिचा शारीरिक व मानसिक छळ केला जात असल्याचा गंभीर आरोप माहेरच्या कुटुंबीयांनी केला आहे.
मुकुंदनगर येथील अक्षय हाइट्स सोसायटीतील जुन्या फ्लॅटमध्ये सोमवारी पायल यांचा मृतदेह छताच्या पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. पायल या एका आयटी कंपनीत कार्यरत होत्या. त्यांचा अक्षय झांबरे यांच्याशी सुमारे पाच वर्षांपूर्वी विवाह झाला होता. या दाम्पत्याला एक मुलगी आहे.
पायल या रविवार रात्रीपासून दिसत नसल्याची माहिती त्यांच्या चुलत सासूने भावाला दिल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर पायल यांचे भाऊ ऋषिकेश यांना माहिती देण्यात आली. कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर संपूर्ण प्रकार उघडकीस आला.
घटनेची माहिती मिळताच स्वारगेट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पायल यांचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पायल यांचे चुलत भाऊ जनार्दन पवार यांनी सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, दिवाळीच्या काळात दरवर्षी ५ ते १० तोळे सोन्याची मागणी केली जात होती. यंदा माहेरच्या कुटुंबीयांनी ही मागणी पूर्ण करण्यास नकार देत पुढील वर्षापर्यंत थांबण्याची विनंती केली होती. मात्र, त्यानंतरही पायल यांच्यावर दबाव टाकण्यात आला आणि त्यांचा मानसिक व शारीरिक छळ सुरूच राहिला, असा आरोप पवार यांनी केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.