Pune BJP Chandrakant Patil latest new : पुणे शहर भाजपच्या वतीने आज पक्षाच्या शहर कार्यालयात तीन जणांचा पक्षप्रवेश पार पडला. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे (ज्यांनी महापालिका निवडणूक अपक्ष म्हणून लढवली होती) प्रमोद निम्हण, मनसेचे शहर संघटक राहिलेले प्रल्हाद गवळी आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या महिला पदाधिकारी वैष्णवी किरड यांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे सध्या कोणतीही निवडणूक नसतानाही भाजपने घडवून आणलेल्या या पक्षप्रवेशामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या तिघांचाही आज मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झाला. एकेकाळी राष्ट्रवादीत अत्यंत निष्ठावान मानल्या जाणाऱ्या तर दुसरीकडे मनसेचे खंदे समर्थक अशी ओळख असलेल्या प्रमोद निम्हण आणि प्रल्हाद गवळी यांच्या पक्षप्रवेशामुळे शहरात राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत.
प्रमोद निम्हण हे राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्वासू म्हणून ओळखले जात असत. तसेच ते राष्ट्रवादीचे नगरसेवकही राहिलेले आहेत. पुणे महापालिका निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच या ठिकाणी निम्हण यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे पॅनेल स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. पक्षपातळीवर यासंदर्भात अनेक बैठकाही झाल्या. मात्र, ऐनवेळी निम्हण यांना डावलून बाबुराव चांदेरे यांना पक्षाने उमेदवारी दिली. निम्हण यांच्यासह अनेक स्थानिकांनी या निर्णयाचा निषेध केला होता. याबाबत प्रभाग क्रमांक ९ मधील स्थानिकांनी या निर्णयाला विरोध दर्शवला. इतकेच नाही तर निम्हण यांना उमेदवारी नाकारल्याच्या निषेधार्थ पाषाण परिसरात एक दिवस कडकडीत बंद पाळण्यात आला होता आणि याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले होते. त्यामुळे निम्हण यांनी थेट अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. निवडणुकीच्या रिंगणात उतरत त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आणि "शिट्टी" या चिन्हावर निवडणूक लढवली; मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
"२०२६ मध्ये अपक्ष निवडणूक लढवली तेव्हा प्रभागातून मला १८ हजार मते मिळाली होती. प्रभागाचा विकास व्हावा म्हणूनच भाजपमध्ये प्रवेश केला. २०१७ पासून नगरसेवक आमच्या भागात फिरलेच नाहीत, आता तिथे विकासाची कामे केली जातील," असे मत निम्हण यांनी पक्षप्रवेशानंतर व्यक्त केले.
पुण्यातील रविवार पेठ - नाना पेठ या भागात गेल्या अनेक वर्षांपासून काम करणारे प्रल्हाद गवळी यांनी आज मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र केला. भाजपमध्ये प्रवेश करताना पक्षश्रेष्ठींना पूर्वकल्पना दिली नसल्याची माहिती त्यांनी स्वतः दिली. प्रल्हाद गवळी मित्र परिवारातर्फे दरवर्षी गणेशोत्सवात 'मूर्ती आमची, किंमत तुमची' हा उपक्रम राबवला जातो. २०२३ मध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील गवळी यांच्या प्रभागात जाऊन या उपक्रमाला भेट दिली होती.
"समाजात काम करताना अधिक चांगले काम करता यावे म्हणून भाजपचे कमळ हाती घेतले आहे. मी माझा निर्णय घेतला असून मनसेत कोणालाही याबाबत सांगितले नाही," अशी प्रतिक्रिया मनसेला रामराम ठोकत प्रल्हाद गवळी यांनी दिली.
वैष्णवी किरड यांनी आधी काँग्रेस आणि नंतर शिवसेनेत (एकनाथ शिंदे) काम केले होते; मात्र आज त्यांनी भाजपचे कमळ हाती घेतले. "भाजप आणि शिवसेनेत कोणतीही खदखद नव्हती. महापालिका निवडणुकीत सर्वांनाच अपेक्षा असतात, पण कोणी कोणाच्या विरोधात लढले नाही. भाजप हा मोठा राष्ट्रीय पक्ष आहे आणि माझी कोणाशीही स्पर्धा नाही," अशी प्रतिक्रिया किरड यांनी दिली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.