तळेगाव एमआयडीसीतील शॅफ्लर इंडिया कंपनीत CO₂ गॅस गळती
दुर्घटनेत दोन कामगारांचा मृत्यू, तिघेजण गंभीर जखमी
बचावकार्य सुरू आहे
गॅस गळतीचे नेमके कारण अस्पष्ट
दिलीप कांबळे, मावळ
पुण्याच्या मावळ तालुक्यातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मावळ तालुक्यातील तळेगाव एमआयडीसी परिसरातील नवलाख उंबरे येथील शॅफ्लर इंडिया कंपनीत कार्बन डायऑक्साइड (CO₂) गॅस गळतीची गंभीर घटना घडली आहे. या दुर्घटनेत दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मावळ तालुक्यातील तळेगाव एमआयडीसी परिसरातील नवलाख उंबरे येथील शॅफ्लर इंडिया कंपनीत कार्बन डायऑक्साइड गॅसची गळती झाली. सुरुवातीला कंपनी परिसरात गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची चर्चा होती. मात्र प्राथमिक तपासात ही घटना कार्बन डायऑक्साइड (CO₂) गॅस गळतीमुळे घडल्याचे स्पष्ट झाले आहे. या दुर्घटनेत गणेश उंबरे आणि वैभव थोरात या दोन कामगारांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर श्रीकृष्ण साहू, गौरीशंकर शर्मा आणि नरसिंह पाटील हे तिघे गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी सुरक्षा यंत्रणा, अग्निशमन दल तसेच पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. संबंधित विभागांनी तातडीने परिसर रिकामा करून सुरक्षा उपाययोजना राबवल्या. गॅस गळतीचा परिणाम इतर विभागांवर होऊ नये यासाठी आवश्यक खबरदारी घेण्यात आली.
गॅस गळतीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून तपास सुरू आहे.या घटनेमुळे तळेगाव एमआयडीसी परिसरात खळबळ उडाली असून कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मृत कामगारांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, प्रशासनाकडून घटनेचा सखोल तपास सुरु आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.