देशातील सर्वात मोठ्या आणि महाराष्ट्रातील पहिल्या ‘महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो’चे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्रात संरक्षण उद्योगाला चालना देण्यासाठी नवे धोरण तयार करण्यात येईल आणि या क्षेत्रातील सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांच्या विकासासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रात २०१७ मध्ये एअरोस्पेस आणि डिफेन्स धोरण तयार केले आणि या क्षेत्राला चालना देण्यासाठी १ हजार कोटीचा निधी तयार करण्यात आला. त्यातून ६०० एमएसएमई तयार झाल्या आहेत. केवळ ३०० कोटीतून १२ ते १५ हजार कोटींचे मूल्य या उद्योग संस्थांनी तयार केले. आज जगातले सगळे देश संरक्षण क्षेत्रात भारतासोबत काम करण्यास तयार आहेत. या पार्श्वभूमीवर संरक्षण क्षेत्रातील एमएसएमईसाठी अधिक सुविधा आणि सवलती देण्याचे धोरण स्वीकारण्यात येईल. रोजगार निर्मितीसोबत चांगली शस्त्रास्त्रे राज्यात तयार होतील याचेही प्रयत्न करू, असे फडणवीस म्हणाले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाची शक्ती ओळखली. आपला देश शस्त्रास्त्रांसाठी परदेशावर अवलंबून होता. आज जगाच्या पाठीवर सामरिक शक्तीत पहिल्या पाचमध्ये असलेले देश स्वत:ची संरक्षण सामग्री स्वत:च्या देशात तयार करून जगाला निर्यात करतात. हीच क्षमता देशात निर्माण करण्यासाठी ‘मेक इन इंडिया’ वर भर देण्यात आला. भारताने शस्त्र निर्यात करणाऱ्या देशांसाठी त्याचा काही भाग भारतात उत्पादन करावा लागेल आणि निर्मिती तंत्रज्ञानाचे हस्तांतरण करावे लागेल अशी अट ठेवली. म्हणून देशात संरक्षण उत्पादन क्षमता निर्माण झाली. जगातील उत्तम शस्त्रसामुग्री देशात निर्माण होत आहे. यामुळे देशाचे लाखो कोटी रुपये वाचले आहेत आणि आपली वाटचाल आत्मनिर्भरतेकडे सुरू आहे. विमान आणि युद्धनौकेसाठी लागणारा ३० टक्के दारुगोळा भारतात तयार होत आहे, असेही फडणवीस म्हणाले. (Latest Marathi News)
पुणे हे भारताच्या सामरीक शक्तीच्यादृष्टीने महत्वाचे केंद्र असून गेल्या अनेक वर्षात संरक्षण उत्पादनाची चांगली व्यवस्था पुण्यात निर्माण झाली आहे. संरक्षण उत्पादन क्षेत्रात महाराष्ट्र देशात अग्रणी आहे. देशाच्या वायुसेनेचे मेंटेनन्स कमांड, लष्कराचे दक्षिण कमांड, नौदलाचे मुंबई डॉकयार्ड महाराष्ट्रात आहे. नाशिकमध्ये हिंदुस्थान एअरोनॉटीकल्समध्ये तेजस आणि सुखोई अशी लढाऊ विमाने तयार होतात, माझगाव डॉकमध्ये जहाज बांधणीची आधुनिक व्यवस्था आहे, भारत इलेक्ट्रॉनिक्ससारखी संरक्षण क्षेत्रात उच्च तंत्रज्ञानयुक्त काम करणारी यंत्रणा आपल्याकडे आहे.
अमरावतीजवळ बीडीएल मिसाईल उत्पादन युनिट सुरू होत आहे. चंद्रयान-३ करता भंडाऱ्याच्या ऑर्डीनन्स फॅक्टरीमध्ये काही भाग बनले. राज्यात ११ ऑर्डीनन्स फॅक्टरी, ५ डिफेन्स पीएसयु, ८ विविध प्रकारच्या प्रयोगशाळा आहे. पुण्यात डिआरडीओची सर्वोत्तम सुविधा आणि देशाची महत्वाची राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीदेखील आहे. म्हणून एमसएसमईसाठी महत्वाचे स्थान महाराष्ट्र आहे आणि राज्यात पुणे आहे.
संरक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. पुणे तंत्रज्ञानाची राजधानी आहे. या क्षेत्रात महाराष्ट्र पुढे गेला आहे. यासाठी पुरवठा साखळीचा भाग होणाऱ्या एमएसएमईसाठी चार क्लस्टर तयार करण्याचे उद्योग विभागाने ठरविले आहे. त्यातून या क्षेत्रात काम करणारे उद्योजक तयार करता येतील. प्रदर्शनात खाजगी संस्थांचा चांगला सहभाग आहे. नवीन इको सिस्टीम तयार करण्यासाठी ही महत्वाची बाब आहे. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी डिफेन्स मॅन्युफॅक्चरींग ही मोठी संधी आहे. प्रदर्शनातून आपल्याला या इको सिस्टीमचा भाग कसा होता येईल याचा विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.