Pune Crime News: गेल्या काही दिवसांपासून पुण्यात महिला अत्याचार तसेच विनयभंगाच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे पुणे पोलिस (Pune Police) अॅक्शन मोडवर आले असून महिलांची छेड काढणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल केले जात आहेत. अशातच पुणे पोलिसांच्या व्हॉटसअप हेल्पलाइन क्रमांकावर एका तरुणीची छेड काढल्याचा संदेश प्राप्त झाला.
यामध्ये एका व्यक्तीने आपली छेड काढली, अशी तक्रार करत तरुणीने शिक्षेची मागणी केली होती. पुणे पोलिसांनी तातडीने या तक्रारीची दखल घेत अवघ्या काही तासांत त्या तरुणीची छेड काढणाऱ्या व्यक्तीला अटक केली. अनुप प्रकाश वाणी (वय ४४, रा. सदाशिव पेठ) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणी ५ जुलै रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास आपल्या मैत्रीणीसोबत रस्त्याने पायी जात होती. त्यावेळी एका व्यक्तीने त्यांच्याजवळ येत ‘मला चक्कर येत आहे, तुम्ही मला माझ्या दुचाकीवर पुढे सोडा’, अशी विनंती केली.
माणुसकीच्या दृष्टीने या तरुणीने त्या व्यक्तीला मदत करण्याचे ठरवले. या तरुणीने त्याच्याकडील दुचाकी घेतली. तो व्यक्ती दुचाकीवर पाठीमागे बसला. काही अंतरावर गेल्यानंतर त्याने तरुणीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श (Crime News) करण्यास सुरूवात केली. त्यामुळे घाबरलेल्या तरुणीने दुचाकीवर मागे बसलेल्या व्यक्तीला तेथेच रस्त्यात सोडले.
काही वेळात या तरुणीची मैत्रीण सायकलवरून तेथे आली. या तरुणीने मैत्रिणीला घडलेला प्रकार सांगितला. घडलेल्या प्रकारानंतर तरुणीने पुणे पोलिसांनी महिलांच्या सुरक्षिततेबाबत सुरू केलेल्या व्हॉटसअप क्रमांकावर आणि ट्विटरवर मॅसेज करत तक्रार दाखल केली.
दरम्यान, नियंत्रण कक्षातून चतुःशृंगी पोलिसांना ही बाब कळविण्यात आली. त्यावर चतुःशृंगी पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे आणि त्यांच्या पथकाने तातडीने परिसरातील सीसीटीव्ही तपासून आरोपीला काही तासांतच शोधून काढले.
पोलिसांनी आरोपीला अटक करत खाक्या दाखवल्या असता, त्याने अशा प्रकारे शिवाजीनगर, डेक्कन परिसरात काही तरुणींचा विनयभंग केल्याची कबूली दिली. दरम्यान, महिलांसोबत असे प्रकार घडताच त्यांनी ८९७५९५३१०० या व्हॉट्सअॅप क्रमांकावर किंवा संबंधित पोलिस ठाण्यात तक्रार करावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.