पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात उद्यापासून पुणे पुस्तक महोत्सवाला सुरुवात होतेय. या ठिकाणी वाचक आणि पुस्तक प्रेमींना तब्बल ८०० बुक स्टॉल ला भेट देता येणार आहे आणि विशेष म्हणजे तब्बल ५० लाख पुस्तकं याठिकाणी पाहता आणि वाचता येणार आहेत. मराठी, हिंदू, इंग्रजी, तमिळ, तेलगू या सारख्या विविध भाषांमधील पुस्तकं याठिकाणी पुस्तक प्रेमींना पाहायला मिळणार आहेत. ९ दिवस होणाऱ्या या महोत्सवात केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचे व्याख्यान आयोजित केलं आहे. यासोबतच इस्रो 'गगनयान' कार्यक्रमातील अंतराळवीर म्हणून ओळखले जाणारे हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांचे व्याख्यान सुद्धा या महोत्सवात आयोजित केलं आहे. उद्यापासून सकाळी ११ ते रात्री ८ पर्यंत हा महोत्सव खुला राहील.
राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या (एनबीटी) पुणे पुस्तक महोत्सव नेमका कसा असणार आहे याबाबत बोलताना संयोजक राजेश पांडे म्हणाले, "पुणे पुस्तक महोत्सवाचे हे तिसरे वर्ष आहे. विविध भाषांमधून उपलब्ध असणारे पुस्तकं पुणेकरांना अनुभवता येईल. बाल महोत्सव, मिलेट महोत्सव, छायाचित्रांचे प्रदर्शन, १०० पेक्षा जास्त फूड स्टॉल यासारखे विविध उपक्रम या महोत्सवात आयोजित केले जाणार आहेत. बिहार चे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांच्या हस्ते पुणे लिट फेस्ट’चे उद्घाटन होईल. शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. शरणकुमार लिंबाळे, प्रविण दीक्षित, बानू मुश्ताक,एम. जे. अकबर, सचिन पिळगावकर असे विविध मान्यवर यांचे व्याख्यान याठिकाणी होणार आहे. एका छताखाली हजारोंच्या संख्येने उपलब्ध होणारी पुस्तकं आणि त्यातून वाचन संस्कृती वृद्धिंगत व्हावी हा या महोत्सवाचा उद्देश आहे."
देशातील प्रज्ञावंतांचे विचार आणि संवाद
या महोत्सवात 'पुणे लिट फेस्ट’चे आयोजन करण्यात आले आहे. त्यातील पहिले तीन दिवस मराठीत साहित्यिक, वैचारिक, शैक्षणिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. मराठी, हिंदी व इंग्रजी अशा तीन भाषांमधून ४० पेक्षा अधिक प्रज्ञावंतांचे विचार ऐकण्यासोबतच, त्यांच्याशी संवाद साधता येणार आहे. पहिल्या तीन दिवसांमध्ये मराठी साहित्यविषयक सत्रांचे आयोजन करण्यात आले त्यात साहित्यिकांच्याच जोडीने प्रशासन, उद्योग, संशोधन, समाजकारण आदी क्षेत्रांमधील नामवंत व्यक्तींच्या साहित्याचे विश्लेषण अनुभवता येणार. शरणकुमार लिंबाळे, डॉ. वसंत शिंदे, जयंत उमराणीकर, प्रविण दीक्षित, आनंद देशपांडे (पर्सिस्टंट), अविनाश धर्माधिकारी, शेफाली वैद्य यासारखे मराठी साहित्यिक आहेत तसेच हिंदी व इंग्रजी साहित्यविषयक सत्रांमधील अक्षत गुप्ता, आचार्य प्रशांत, बी. एस. नागेश, शाहिद सिद्दिकी, शम्स ताहिर यांचें व्याख्यान आयोजित केले गेले आहेत.
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला संवाद साधणार
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) 'गगनयान' कार्यक्रमातील अंतराळवीर म्हणून ओळखले जाणारे हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी जुलै २०२५ मध्ये आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला भेट दिली. ही भारतासाठी अभिमानास्पद कामगिरी ठरली. शुक्ला हे अंतराळात जाणाऱ्या राकेश शर्मांनंतरचे दुसरे भारतीय ठरले आहेत, असे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांचे विचार ऐकण्याची आणि त्यांच्याही संवाद साधण्याची संधी २१ डिसेंबर रोजी नागरिकांना मिळणार आहे.
"नॅशनल क्रश" गिरिजा ओक सुद्धा राहणार उपस्थित
सहजसुंदर तसेच मनमोकळ्या आणि निखळ स्वभावासाठी प्रसिद्ध असलेली आणि थेट देशभरात सध्या "नॅशनल क्रश" असलेली गिरिजा ओक सुद्धा या महोत्सवाला हजेरी लावणार असल्यामुळे तिला पाहण्यासाठी तरुणांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. निळ्या साडीतील फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आणि नॅशनल क्रश अशी ओळख जरी त्यांना मिळाली असली, तरी मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत आणि विशेषतः नाट्यरसिकांमध्ये गिरीजा ओक यांनी त्यांनी त्यांच्या अभिनयामुळे छाप पाडली आहे. २७ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झालेली "थेरेपी शेरेपी" या वेब सिरीज मधून प्रसिद्ध झालेल्या गिरिजा ओक यांना पाहण्यासाठी पुणेकर आतुर असणार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.