सागर आव्हाड, पुणे प्रतिनिधी
Dilip Kamble Cars Attacked: पुण्यात भाजपच्या नेत्याच्या घराबाहेरील २ कारची तोडफोड केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या घराबाहेर उभ्या असलेल्या दोन महागड्या गाड्यांची अज्ञात हल्लेखोरांनी तोडफोड केली आहे. विशेष म्हणजे हल्लेखोरांनी नियोजनबद्ध कट रचून कांबळे यांच्या घराजवळील तिन्ही सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यांचे वायर कापून हा हल्ला केला आहे. "घराबाहेर झालेली ही तोडफोड म्हणजे थेट माझ्यावर आणि माझ्या घरावर झालेला हल्ला आहे," अशी संतप्त प्रतिक्रिया दिलीप कांबळे यांनी दिली आहे.
कुटुंब बाहेर गेलेले असताना साधला डाव
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना घोरपडी येथील बी. टी. कवडे रस्त्यावरील प्रसिद्ध 'सिटाडेल एम्प्रेस सोसायटी'मध्ये घडली. सोमवारी रात्री ८ ते ९ वाजेच्या सुमारास दिलीप कांबळे हे आपल्या कुटुंबासह कामानिमित्त बाहेर गेले होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या घराच्या परिसरात प्रवेश केला. कांबळे कुटुंब घरी परत आल्यानंतर त्यांना आपल्या दोन्ही चारचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणावर तोडफोड झाल्याचे निदर्शनास आले.
माझ्यावरच हल्ला करण्याचा प्रयत्न त्यांचा असावा असा मला संशय आहे. मी घरी नसल्यामुळे किंवा आमचे घरचे आम्ही बाहेर गेलो होतो. आणि तासाभराने आम्ही परत आल्यानंतर हा सगळा प्रकार लक्षात आलेला आहे. कदाचित हा माझ्यावरच हल्ला करण्याचा प्रयत्न असू शकतो. -दिलीप कांबळे, भाजप नेते
CCTV च्या तारा कापल्या, केवळ कांबळेंच्याच गाड्यांना लक्ष्य केले
हल्लेखोरांनी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने हा प्रकार घडवून आणल्याचे उघडकीस आले आहे. त्यांनी सर्वप्रथम कांबळे यांच्या घराच्या परिसरातील तिन्ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे वायर तोडले, जेणेकरून त्यांची ओळख पटू नये. त्यानंतर त्यांनी दगड आणि बांबूचा वापर करून केवळ दिलीप कांबळे यांच्याच दोन चारचाकी वाहनांचे प्रचंड नुकसान केले. सोसायटीत उभ्या असलेल्या इतर कोणत्याही वाहनाला हल्लेखोरांनी हातही लावला नाही. यावरून हा हल्ला थेट कांबळे यांनाच लक्ष्य करून करण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे.
या गंभीर घटनेनंतर दिलीप कांबळे यांनी तातडीने मुंढवा पोलीस ठाण्यात धाव घेत अज्ञात हल्लेखोरांविरोधात फिर्याद दिली आहे. पुण्यात सत्ताधारी पक्षाच्याच वरिष्ठ आणि माजी राज्यमंत्र्याच्या घराबाहेर अशा प्रकारे धाडसी हल्ला झाल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मुंढवा पोलीस सध्या परिसरातील अन्य मार्गांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासून अज्ञात हल्लेखोरांचा कसून शोध घेत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.