Pune News Saam Tv
मुंबई/पुणे

PMPL Navratri Special : प्रवाशांसाठी आनंदवार्ता! देवींच्या दर्शनासाठी पीएमपीएमएलची पर्यटन बससेवा, तिकिटाची किंमत किती?

Pune News : नवरात्रौस्तवात पुणे व पिंपरी-चिंचवडमधील भाविकांसाठी पीएमपीएमएलची वातानुकूलित स्मार्ट इलेक्ट्रिक बससेवा सुरू. एका दिवसात अनेक देवींच्या शक्तिस्थळांचे दर्शन घेण्यासाठी ही बससेवा उपयुक्त.

Alisha Khedekar

  1. नवरात्रौस्तवात पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये पीएमपीएमएलची दोन विशेष बससेवा सुरू

  2. वातानुकूलित स्मार्ट इलेक्ट्रिक बसने देवींच्या शक्तिस्थळांचे दर्शनाची सुविधा

  3. प्रति प्रवासी तिकीट दर ५०० रुपये

  4. वाहतुकीच्या समस्यांवर तोडगा देणारा सोयीस्कर आणि पर्यावरणपूरक उपक्रम

देशभरात उद्यापासून नवरात्रौस्तव सुरु होत आहे. या सणाचे औचित्य साधून पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह जिल्ह्यातील देवींची शक्तिस्थळे दर्शनासाठी पीएमपीएमएलकडून दोन विशेष पर्यटन बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुटीबरोबरच ग्रुप बुकिंगसाठी बससेवा उपलब्ध होणार आहे, या सेवेचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

२३ सप्टेंबर २०२५ पासून या विशेष पर्यटन बससेवा सुरू होणार असून, या बस पूर्णपणे वातानुकूलित स्मार्ट इलेक्ट्रिक असतील. पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा वापर करून या बस तयार करण्यात आल्या आहेत. त्यामुळे भाविकांना प्रवासादरम्यान आरामदायी अनुभव मिळणार असून, पर्यावरण संवर्धनालाही हातभार लागणार आहे. भाविकांच्या वाढत्या मागणीनुसार आणि परिवहन महामंडळाच्या उत्पन्नवाढीच्या दृष्टीने हा उपक्रम राबविण्यात आला आहे.

या बससेवेचे बुकिंग डेक्कन जिमखाना, पुणे स्टेशन, स्वारगेट, कात्रज, हडपसर गाडीतळ, पुणे मनपा भवन, भोसरी बसस्थानक आणि निगडी येथील पीएमपीएमएलच्या पास केंद्रांवर करता येणार आहे. यामुळे शहराच्या विविध भागातील भाविकांना बुकिंगसाठी सोयीस्कर पर्याय उपलब्ध होणार आहेत.

विशेष पर्यटन बससेवेअंतर्गत दोन मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. पहिल्या क्रमांकाच्या बससेवेत पुणे स्टेशन, स्वारगेट, तळजाई माता मंदिर, पद्मावती मंदिर, तुकाई माता मंदिर कोंढाणपूर, श्रीनाथ म्हस्कोबा जोगेश्वरी माता मंदिर कोडीत (ता. पुरंदर), यमाई माता मंदिर शिवरी (ता. पुरंदर), स्वारगेट आणि पुन्हा पुणे स्टेशन असा प्रवास होईल. ही बस सकाळी ८:३० वाजता पुणे स्टेशनवरून सुटेल आणि संध्याकाळी ७ वाजता परत येईल. प्रवाशांना दिवसभर विविध शक्तिस्थळांचे दर्शन घेता येणार असून, तिकीट दर प्रति प्रवासी ५०० रुपये निश्चित करण्यात आला आहे.

दुसऱ्या मार्गातील बस पुणे स्टेशनवरून सुटून स्वारगेट, महालक्ष्मी मंदिर, सारसबाग, तांबडी जोगेश्वरी मंदिर (बुधवार पेठ), चतुशृंगी माता मंदिर (सेनापती बापट रोड), वैष्णवी माता मंदिर, पिंपरी कॅम्प भवानी माता मंदिर, भवानी पेठ, स्वारगेट आणि पुन्हा पुणे स्टेशन असा प्रवास करेल. या बसची वेळ पहिल्या मार्गासारखीच असून, सकाळी ८:३० वाजता सुटून संध्याकाळी ७ वाजता पुणे स्टेशनवर परतेल. या मार्गासाठी देखील प्रति प्रवासी ५०० रुपये इतका दर निश्चित करण्यात आला आहे.

नवरात्रात देवींच्या दर्शनासाठी शहरातील विविध मंदिरांत भाविकांची प्रचंड गर्दी उसळते. अनेकदा वाहतुकीची कोंडी, पार्किंगची समस्या यामुळे भाविकांना अडचणींचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत पीएमपीएमएलची ही विशेष बससेवा भाविकांसाठी वरदान ठरणार आहे. भाविकांना एका दिवसात अनेक शक्तिस्थळांचे दर्शन घेण्याची संधी मिळेल, प्रवास सुरक्षित आणि आरामदायी होईल तसेच वाहतुकीची समस्या टळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aadhar Card Update : आधार कार्डाबाबत सरकारचा मोठा निर्णय; आता अपडेटसाठी पैसे द्यावे लागणार नाहीत

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहीणी योजनेत बदल! या 7 कागदपत्रांशिवाय e-KYC पूर्ण होणार नाही

Maharashtra Live News Update: लातूरमध्ये ओढ्याला आलेल्या पुरात २ जण वाहून गेले,एकाचा मृत्यू

BJP नेत्याला शिवीगाळ अन् कानशिलात लगावली; कार्यकर्त्यांचा ठिय्या, पोलीस इन्स्पेक्टर निलंबित

एका दिवसात किती संत्री खाऊ शकतो?

SCROLL FOR NEXT