रश्मी पुराणिक
मुंबई : राज्य लोकसेवा आयोगाच्या (MPSC) राज्य सेवा मुख्य परीक्षेत चंद्रकांत दळवी आयोगाने केलेल्या बदलासंदर्भात अनेक परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली असून, त्यांची मुख्य परीक्षेसाठी पुरेसा वेळ मिळण्याची प्रमुख मागणी व अन्य विषयांसंदर्भात माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे एका पत्राद्वारे मागणी केली आहे. (Dhananjay Munde News)
धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक पत्र लिहिले असून, यात त्यांनी राज्यसेवा मुख्य परीक्षेत केलेल्या नवीन बदलांना आत्मसात करण्यासाठी परीक्षार्थी विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळावा व यासह अन्य मागण्यांसादर्भात महाराष्ट्र लोकसेवा आयोग, चंद्रकांत दळवी समिती, विद्यार्थी प्रतिनिधी यांची एकत्रित बैठक घेऊन परीक्षार्थी विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळावा याबाबत निर्णय घेण्याची विनंती केली आहे.
राज्य लोकसेवा आयोगाने चंद्रकांत दळवी यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीने राज्यसेवा मुख्य परीक्षा ही जुन्या वस्तुनिष्ठ पद्धतीत बदल करून UPSC परीक्षेच्या धर्तीवर वर्णनात्मक (descriptive) पद्धतीने घेण्याची शिफारस केली होती, त्यानुसार आयोगाने निर्णय घेतला होता. यामुळे यूपीएससी परीक्षेत देखील महाराष्ट्राचा टक्का वाढणार आहे. (Eknath Shinde News)
मात्र, परीक्षा पद्धतीत अचानक बदल झाल्यामुळे या नवीन परीक्षा पद्धतीला आत्मसात करून तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा व राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 पर्यंत घेण्यात येऊ नये, अशी मागणी अनेक विद्यार्थ्यांनी आपल्याकडे तसेच आणखी काही लोकप्रतिनिधी व राज्य लोकसेवा आयोगाकडे केली असल्याचे धनंजय मुंडे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
मागील काही वर्षांपासून राज्य सेवा परीक्षेची तयारी करणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नव्याने बदल केलेल्या पद्धतीने परीक्षेला सामोरे जाण्यासाठी पुरेसा वेळ मिळणे नैसर्गिक न्यायाने अपेक्षित असून, याबाबतचा सकारात्मक निर्णय विद्यार्थी प्रतिनिधींना विचारात घेऊन करणे अपेक्षित असल्याचेही धनंजय मुंडे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. (MPSC Latest News)
कोविड काळानंतर विद्यार्थ्यांना आता कुठे चांगल्या पद्धतीने पूरक सुविधांसह अभ्यास करता येऊ लागला होता. शिवाय वर्णनात्मक पद्धतीने परीक्षा घ्यावयाची असल्यास या लेखी परीक्षेची तयारी करण्यासाठी परीक्षार्थींना 2 ते 3 वर्षांचा वेळ मिळावा, म्हणून या निर्णयाची अंमलबजावणी राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 पर्यंत पुढे ढकलावी, अशी विनंती मराठवाड्यातील अनेक विद्यार्थ्यांनी धनंजय मुंडे यांच्या कडे केली होती.
त्यामुळे सदर विषयी लवकरात लवकर राज्य स्तरावर एक बैठक आयोजित करण्यात यावी, तसेच मराठवाड्यातील विद्यार्थ्यांची बाजू मांडण्यासाठी आपल्याला या बैठकीस निमंत्रित करण्यात यावे, अशी मागणीही मुंडे यांनी आपल्या पत्रात केली आहे.
एमपीएससी मुख्य परीक्षेला सामोरे जाणारे अनेक परीक्षार्थी मागील अनेक दिवसंपासून समाज माध्यमे, लोकप्रतिनिधी आदींमार्फत आपला आवाज राज्य सरकारकडे पोचवण्याचा प्रयत्न करत असून, त्यांच्या आवाजाला आता धनंजय मुंडे यांची खंबीर साद भेटली असल्याने परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
Edited By - Satish Daud
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.