मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट लिहिल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chital) सध्या पोलीस कोठडीत आहे. केतकीवर राज्यभरात अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. तिच्या अडचणींत सातत्याने वाढ होत आहे. अशात राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केतकीबाबत फेसबुकवर पोस्ट लिहित टीका केली आहे. तसेच केतकीचं समर्थन करणाऱ्यांनाही आव्हाडांनी धारेवर धरलं आहे. केतकीने शरद पवारांबाबत फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट लिहिली होती, यामुळे ती सध्या तुरुंगात आहे. (NCP Leader Jitendra Awhad Criticized to Actress Ketaki Chitale in His Facebook Post)
हे देखील पाहा -
राष्ट्रवादीने नेते तथा मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी फेसबुकवर पोस्ट लिहीत केतकीवर पलटवार केले आहेत. केतकीबाबत अनेक प्रकरणांची माहिती देत तिच्या अगोदरच्या कृत्याबद्दलही सगळा इतिहासच सांगितला आहे. पुरोगामी महाराष्ट्राच्या सगळ्या महामानवांना शिव्या द्यायच्या आणि काही लोकांनी उठायचं आणि म्हणायचं निरागस आहे सोडून द्या. ह्याला काय म्हणायचे? असं आव्हाड सुरुवातीला म्हणाले. त्यानंतर त्यांनी केतकीच्या वयाचा खुलासा केला. आव्हाड म्हणाले की, केतकी चितळे हि ३४ वर्षांची आहे २९ वर्षांची नाही. ठाण्यात दाखल गुन्ह्यात केतकी हीच्याकडे तपास पूर्ण झाल्यावर स्वतःहून पोलिसांनी तिची पोलीस कोठडी न मागता न्यायालयीन कोठडी मागितली आहे. त्यानंतर त्या प्रकरणात ईतर ठिकाणी जरी गुन्हे नोंद असले तरी तिचा राज्यातील अन्य कोणत्याही पोलिसांनी तिचा ताबा मागितला नाही अथवा तिला "त्या आक्षेपार्ह पोस्ट" फेसबुकवर अपलोड केल्याबद्दल अटक केली नाही ही पण एक समंजसपणाची कृतीच म्हणावी लागेल असं आव्हाड म्हणाले.
आक्षेपार्ह अश्लील आणि बेताल लिखाण केल्याबद्दल केली अटक
आव्हाड पुढे म्हणाले की, २०२० मध्ये अगोदरच केतकी चितळे हिने डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई आणि महात्मा फुले यांच्याबद्दल अत्यंत अश्लील अश्लाघ्य आणि निषेधार्य पोस्ट अपलोड केल्या होत्या. त्यावेळी म्हणजे २०२० मध्ये केतकी जरी ३२ वर्षांची असली तरी नासमज आहे असे समजून पोलिसांनी कदाचित अटक केली नसेल परंतु आवश्यक तपासानंतर तिच्याविरुद्ध पुरावा मिळाल्याने दोषारोपपत्र दाखल कारण्याची परवानगी रबाळे पोलिसांनी मागितली आहे. आता आज केतकी ला २०२० मध्ये तिने वरीलप्रमाणे इतिहासातील महामानवांबद्दल आणि दलित समाजाबद्दल अत्यंत आक्षेपार्ह अश्लील आणि बेताल लिखाण केल्याबद्दल अटक केली आहे. कारण आमच्या माहितीनुसार केतकीने या सर्व पोस्ट मीच फेसबुकवर share केल्या असून त्याबद्दल मी ठाम असून त्या डिलीट करणार नसल्याचे पोलिसांना काय न्यायालयात पण स्पष्ट सांगितले आहे.
...तर पोलीस तरी काय करणार?
मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये पुढे सांगितलं की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई आणि महात्मा फुले यांच्या बद्दल अत्यंत हिणकस लिखाण शेअर करून देखील त्यावेळी कदाचित पोलिसांनी तिला अटक केली नाही. तिच्याकडून येणारी गुळमुळीत उत्तरे घेऊन तिला एक प्रकारे माफी करून अटक न करता तिच्याविरुद्ध दोषारोपपत्र सादर करण्याचा उपचार केला होता. त्यामुळे तपासात तिने अशा आक्षेपार्ह पोस्ट share केल्या तरी काही होत नाही. पोलिसांना काही कारवाई करण्याचा अधिकार नाही आणि त्या पोस्ट मी डिलीट करणार नाही असा अविर्भाव घेतला होता. पोलिसांनी याबद्दल न्यायालयात अहवाल पण सादर केल्याचे समजते. म्हणजे २०२० मध्ये या ३२ वर्षाच्या निरागस अभिनेत्रीला पुरेशी समज देऊन देखील जर तिच्या दुष्कृत्याबद्दल तिला यत्किंचित पण चूक वाटत नसेल तर याच भारताला राज्यघटना देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि समाजाला स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेची शिकवण देणाऱ्या महात्मा फुले या महामानवांच्या प्रतिमेस जाणीवपूर्वक लांछन लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या या आज ३४ वर्षाच्या या निरागस बालिकेला पुन्हा तशाच स्वरूपाचा गुन्हा करण्याचे बळ नक्कीच मिळाले नसते. कायदा किंवा पोलीस एक दोन वेळ संधी नक्कीच देतात हो. पण आपण त्या संधीसाठी लायक नसेल आणि पोलीस किंवा कायद्याने समजूतदारपणाच्या घेतलेल्या भूमिकेला माझे काय वाकडे केले पोलिसांनी असा समज करून पुन्हा जाणीवपूर्वक त्या चुका नव्हे गुन्हा करण्याचा चंग कोणी बांधला असेल तर पोलीस तरी काय करणार तुम्ही विचार करा असं आव्हाड म्हणाले आहेत.
नथूरामचे समर्थन करणाऱ्याकडून काय अपेक्षा करायच्या?
मंत्री जितेंद्र आव्हाडांनी केतकीच्या फेसबुक पोस्टबद्दलही टीका केली आहे. ते म्हणाले की या निरागस बालिकेच्या फेसबुक वॉलवर जाऊन जरा बघा केतकीने काय गुण उधळले आहेत. शिवाजी महाराज. महात्मा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर, रमाई आंबेडकरी जनता ह्यांच्याबद्दल जे काही लिहिले आहे ते निरागस बालिकेनी लिहिले आहे असे म्हणाऱ्यांचे मन कुठल्या विचारांनी भरले आहे हे स्पष्ट होते. अर्थात गांधी हत्या करणाऱ्या नथूरामचे समर्थन करणाऱ्याकडून काय अपेक्षा करायच्या? असं म्हणत त्यांनी केतकीला समर्थन करणाऱ्यांवरही टीका केली आहे.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.