विकास मिरगणे, नवी मुंबई प्रतिनिधी
Navi Mumbai Expiry Date Scam Exposed: खाद्यपदार्थांवरील मूळ मुदत (एक्स्पायरी डेट) बदलून त्यावर वाढीव तारखेचे स्टिकर चिकटवणाऱ्या एका मोठ्या काळाबाजाराचा गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला आहे. नवी मुंबईतील तुर्भे एमआयडीसी परिसरातील एका कंपनीवर टाकलेल्या छाप्यात परदेशात पाठवला जाणारा ७५ लाख रुपयांचा खाद्यपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) मदतीने या प्रकरणी १२ जणांवर तुर्भे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मसाल्याचे पदार्थ आणि चहा पावडरचाही समावेश
तुर्भे एमआयडीसीमधील 'साधना इंटरप्रायजेस' नावाच्या कंपनीत भारतीय उत्पादनांवरील मूळ 'एक्स्पायरी डेट' बदलून वाढीव मुदतीचे स्टिकर चिकटवले जात असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय शिंदे यांच्या पथकाने २४ ऑगस्ट रोजी कंपनीवर छापा टाकला.
या कारवाईदरम्यान पोलिसांना कंपनीत मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थांचा साठा आढळून आला. यामध्ये विविध प्रकारचे मसाल्याचे पदार्थ, चहा पावडर आणि इतर दैनंदिन खाद्यपदार्थांच्या पाकिटांचा समावेश होता. पोलिसांनी या ठिकाणाहून तब्बल ७५ लाख २१ हजार रुपये किमतीचा साठा जप्त केला आहे.
संबंधित कंपन्यांकडून हे खाद्यपदार्थ विविध देशांमध्ये निर्यातीसाठी पाठवले जातात. मात्र, ते पदार्थ संबंधित देशांत पोहोचेपर्यंत त्यांची मूळ मुदत संपत आलेली असायची. त्यामुळे मूळ उत्पादक कंपनीने छापलेली 'एक्स्पायरी डेट' हटवून त्यावर नवीन आणि वाढीव मुदतीची तारीख असलेले स्टिकर चिकटवण्याचे काम या ठिकाणी सोपवले जात होते.
कारवाईदरम्यान घटनास्थळी मोठा साठा आढळल्याने अन्न व औषध प्रशासनाला (FDA) पाचारण करण्यात आले होते. एफडीएच्या पथकाने सलग ५ दिवस सखोल पंचनामा करून याप्रकरणी १२ जणांवर तुर्भे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.