

सागर आव्हाड, पुणे प्रतिनिधी
Amit Thackeray FIR latest news Pune : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे (मनविसे) अध्यक्ष अमित ठाकरे यांच्यासह मनसैनिकांवर सोमवारी पुण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर पुणे पोलिसांनी या प्रकरणात मोठी आणि धडक कारवाई केली आहे. चतुःशृंगी पोलिसांनी रात्री उशिरा मनविसेच्या दोन प्रमुख कार्यकर्त्यांना अटक केली आहे. प्रशांत कनोजिया आणि विक्रांत भिलारे अशी अटक करण्यात आलेल्या मनसैनिकांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, काल पुण्यातील चतुःशृंगी पोलीस ठाण्यात अमित ठाकरे यांच्यासह २० ते २५ मनसैनिकांवर विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेमुळे पुण्यातील राजकीय वातावरण तापले असतानाच, पोलिसांनी थेट ॲक्शन मोडमध्ये येत मध्यरात्री ही अटकेची कारवाई केली. या दोघांच्या अटकेमुळे मनसे सैनिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट पसरली आहे. पुणे पोलिसांच्या या तातडीच्या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात आणि शहरभरात एकच खळबळ उडाली आहे.
अमित ठाकरेंसह मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा का दाखल झाला?
अमित ठाकरे हे सोमवारी पुणे दौऱ्यावर होते. ते विद्यार्थ्यांच्या वसतिगृह, कॅन्टीन आणि असुविधांच्या तक्रारींसंदर्भात प्राचार्यांची भेट घेण्यासाठी गेले होते. प्राचार्यांच्या केबिनमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही फोटो लावलेला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शेजारी पंतप्रधानांचा फोटो लावण्याला अमित ठाकरे यांनी आक्षेप घेतला. मनसे कार्यकर्त्यांनी प्राचार्यांच्या केबिनमधील पंतप्रधान मोदींचा फोटो हटवला.
महाविद्यालयाच्या आवारात आणि प्राचार्यांच्या केबिनमध्ये विनापरवानगी बेकायदेशीरपणे प्रवेश करून प्रचंड घोषणाबाजी केल्याचा अमित ठाकरे आणि मनसे कार्यकर्त्यांवर आरोप आहे. कॉलेजचे प्राचार्य डॉ. राजेंद्र पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मनसे कार्यकर्त्यांनी प्राचार्यांना व तिथल्या कर्मचाऱ्यांना दमदाटी केली आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केला. या घटनेनंतर प्राचार्य डॉ. राजेंद्र पाटील यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अमित ठाकरेंच्या सह २० ते २५ मनसैनिकांवर भारतीय न्याय संहिता (BNS) आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यातील संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
अमित ठाकरेंवर अद्याप अटकेची कारवाई झालेली नाही, मात्र त्यांना पोलीस चौकशीची नोटीस पाठवली जाण्याची शक्यता आहे. या प्रकरणात मनविसेच्या २ स्थानिक कार्यकर्त्यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. दाखल करण्यात आलेल्या कलमांनुसार (शासकीय कामात अडथळा, बेकायदेशीर जमाव जमवणे इत्यादी) पोलिसांकडून प्रथम चौकशी केली जाईल. त्यानंतरच पुढील अटकेबाबतचा निर्णय पोलीस घेतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.