मुंबई : विधानसभा निवडणुकीत मुसंडी मारणाऱ्या भारतीय जनता पक्षात सध्या जोरदार इनकमिंग सुरु आहे. सर्वोच्च न्यायालयानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा केल्यानं महापालिकेच्या निवडणुका कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपने पक्षांतरांचा धडाका लावला आहे. ज्या नेत्यांवर आरोप, त्यांनाच पावन करण्याची परंपरा भाजपनं कायम राखली आहे. याआधी भाजप नेत्यांनी गंभीर आरोप केलेले अशोक चव्हाण, नारायण राणे, कृपाशंकर सिंह, अजित पवार, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, प्रफुल पटेल, सुनील तटकरे ही मंडळी आज महत्त्वाच्या पदांवर आहेत.
सुधाकर बडगुजर हे ठाकरे गटात असताना भाजपकडून त्यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. सुधाकर बडगुजर आणि अंडरवर्ल्ड डॉन सलीम कुत्ता यांचा एका पार्टीतील एकत्र डान्स करतानाचे फोटो समोर आले होते. भाजप आमदार नितेश राणे यांनी त्यावेळी विधानसभेत हे फोटो दाखवत अख्खं सभागृह डोक्यावर घेतलं होतं. त्यावेळी तत्कालीन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी केली जाईल, अशी घोषणाही केली होती. मात्र, आता सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब होताच भाजप नेत्यांची भाषा बदललेली दिसत आहे. आक्रमक शैलीत विरोधकांचे लचके तोडणाऱ्या नितेश राणे यांनीही सुधाकर बडगुजर यांच्या भाजपमधील प्रवेशाचं स्वागत केलं आहे.
'हिंदुत्त्वाचा धागा घेऊन आमच्यासोबत कोणीही येत असेल तर आम्ही त्याचे स्वागतच करणार. बडगुजर आता १०० टक्के भगवाधारी झाले आहेत. त्यामुळे ते आमच्यासोबत येणार असतील त्यांचे स्वागतच आहे. बडगुजर यांचा हिंदुत्वाच्या दिशेने जोरदार प्रवास सुरु आहे. त्यांचा मुलगा काही दिवसांपूर्वी आम्ही काढलेल्या सकल हिंदुत्व मोर्चात आघाडीवर होता. त्यामुळे आता ते येत असतील तर हरकत नाही,' असे नितेश राणे यांनी म्हटलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.