मुंबईत मतदारयादीत मोठा घोळ
चारकोप विधानसभा मतदारसंघात मतदार यादीतील मोठा घोळ समोर
एका घराच्या पत्त्यावर वेगवेगळ्या राज्यांतील सहा आडनावांच्या व्यक्तींची नावे
राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसेकडून तपासणी सुरू
मुंबईत संपूर्ण भारत बसला जातो, असं आपण नेहमी म्हणतो. मात्र राज्य निवडणूक आयोगाच्या कामगिरीमुळे आता हे वाक्य अक्षरशः सत्य ठरत आहे. कारण मुंबईच्या चारकोप विधानसभा मतदारसंघात एका घरातच मराठी मतदारांसोबत उत्तर भारतातील विविध राज्यातील लोकांसोबतच गुजरातच्या कच्छमधील देखील मतदारांची नावे समाविष्ट केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मतदार यादीतील घोळ तपासण्याचे काम मनसैनिकांनी हाती घेतले असताना हा कमालीचा प्रकार समोर आला.
चारकोपमधील या मतदार यादीतील एका घराच्या पत्त्यावर गवाणकर, गुप्ता, खवले, रफुकिया, राठोड, जैसलवल विविध आडनाव असणाऱ्या व्यक्ती आढळून आल्या आहेत. एका घराच्या पत्त्यावर वेगवेगळ्या राज्यांतील सहा आडनावांच्या व्यक्तींची नाव आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे.
मतदार यादीतील घोळासंदर्भात मागील काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज प्रचंड आक्रमक झालेले आहेत. त्यांनी घेतलेल्या मेळाव्यात कार्यकर्त्यांना मतदार यादी यांचा बारकाईने अभ्यास करण्याच्या सूचना दिल्या. तर मनसैनिक देखील आता मतदार याद्यांचा अभ्यास करू लागले आहेत. चारकोप विभाग अध्यक्ष दिनेश साळवी यांच्या नेतृत्वाखाली चाललेल्या तपासणीदरम्यान समजले की, एका घरात एकाच पत्त्यावर विविध राज्यांतील मतदारांची नावे नोंदवली गेली आहेत. मनसेकडून यावर निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्याची तयारी सुरू असून या त्रुटीमुळे मतदार यादीच्या विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मतदार यादीचे निरीक्षण करताना चारकोप विधानसभा मतदारसंघातील यादी अभ्यासली गेली. यावेळी क्रमांक त १० या एकाच घर क्रमांकावर लक्ष्मी कृष्णा गवाणकर (७० वर्षे), काशिनाथ भगवान गुप्ता (७१ वर्षे), जयप्रकाश खेदाक गुप्ता(५० वर्षे), अयोध्या काशिनाथ गुप्ता(४० वर्षे), चंद्रकला अयोध्या गुप्ता (३७ वर्षे), तुषार विलास खवले (३३ वर्षे), चमन रफूकिया (५६ वर्षे), उमरी चमन राठोड (५१ वर्षे), संगीता चमन राठोड (४० वर्षे), शामदुलारी काशिनाथ गुप्ता (६४ वर्षे) आणि राजू रामाशंकर जैसलवल (४० वर्षे) अशी देशाच्या वेगवेगळ्या राज्यातील नागरिकांची नावे मतदार म्हणून नोंदविण्यात आली आहे.
चारकोपमध्ये एकाच घरामध्ये वेगवेगळ्या राज्यातील मतदारांची नावं समोर आल्यामुळे आता चर्चा होत आहे. या घटनेमुळे मुंबई शहरात भारत बसलेला आहे हे नियमित वापरले जाणारे वाक्य राज्य निवडणूक आयोगाने प्रत्यक्षात सत्यात उतरवले असल्याचे खोचक मत मनसे चारकोप विधानसभा अध्यक्ष दिनेश साळवी यांनी म्हटले आहे. चारकोपमध्ये घडलेल्या या प्रकारावर स्थानिक नागरिकांकडून संताप व्यक्त होत असून, अनेकांनी चिमटे काढले आहेत की, 'मुंबईत संपूर्ण भारत बसतो, पण आता तर चारकोपमधील एका घरातच संपूर्ण भारत बसला आहे!'
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.