Mumbai to Pune in Just 90 Minutes: मुंबई-पुणे एक्सप्रेसवे (यशवंतराव चव्हाण महामार्ग) हा ९४.५ किमीचा भारतामधील पहिला सहा पदरी हायवे आहे. या महामार्गामुळे मुंबई आणि पुण्यातील अंतर कमी झालेच. पण रायगड अन् नवी मुंबईलाही मोठ फायदा झाला. या महामार्गावरून दररोज लाखो वाहने ये-जा करतात. गेल्या काही दिवसांपासून या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे मुंबई आणि पुणे या दोन शहरातील अंतर पार करण्यासाठी तीन तासांपेक्षा जास्त वेळ लागतोय. त्यामुळेच आता मुंबई आणि पुणे या मार्गावर नवा एक्सप्रेस वे तयार करण्यात येत आहे.
मुंबईहून पुण्याला पोहचण्यासाठी फक्त ९० मिनिटे लागतील, हे कुणी सांगितलं तर तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण नितीन गडकरी यांनी हा प्रवास ९० मिनिटात शक्य असल्याचे सांगितले. मुंबई आणि पुणे यादरम्यान आणखी एक एक्सप्रेसवे ला केंद्राकडून मंजूरी मिळाली आहे. लवकरच याचं काम सुरू होणार आहे. त्याशिवाय मुंबई-बंगळुरू, पुणे-संभाजीनगर, पुणे-नागपूर या महामार्गाचाही माहाराष्ट्रात निर्मिती होणार आहे. हे रस्ते नेमके कसे असतील, याचा खर्च किती असेल? याबाबत जाणून घेऊयात..
महाराष्ट्रातील रस्ते आणि पायाभूत सुविधा अधिक वेगवान करण्यासाठी केंद्र सरकारने १.५ लाख कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबतची नुकतीच माहिती दिली. प्रवाशांचा प्रवास वेळ कमी करणे, लॉजिस्टिक्स कार्यक्षमता सुधारणे आणि वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी केंद्राने राज्यासोबत काही प्रकल्पावर काम सुरूवात केलेय. दुसरा मुंबई-पुणे एक्सप्रेसवे, पुणे ते छत्रपती संभाजीनगरला जोडणारा एक नवीन एक्सप्रेसवे आणि पुण्यातील क्षेत्रातील विविध उन्नत कॉरिडॉर तयार करणे हा केंद्राचा उद्देश आहे.
प्रस्तावित मुंबई-पुणे एक्सप्रेसवे २ हा १३० किलोमीटर लांबीचा महामार्ग असेल. याची अंदाजे किंमत १५,००० कोटी इतकी असेल. सध्या असलेल्या मुंबई-पुणे एक्सप्रेस वेच्या समांतर नवा हायवे तयार करण्यात येणार आहे. या नवीन महामार्गामुळे प्रवासाचा वेळ ३ तासांवरून फक्त ९० मिनिटांवर येण्याची शक्यता आहे.
मुंबई-पुणे एक्सप्रेसवे-२ मुळे वाहतूक कोंडीची कटकट संपणार आहे. लोणावळा-खंडाळा घाटात सध्या मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते. त्यावर केंद्र सरकारने तोडगा काढला आहे. जेएनपीए जवळच्या पागोटे ते पनवेलमधील चौक या ठिकाणांना जोडणाऱ्या रस्त्याला अधिकृत मान्यता मिळाली आहे. एक्सप्रेसवे मुंबई आणि पुणे दरम्यान कनेक्टिव्हिटी वाढवेल, त्यामुळे दैनंदिन प्रवासी, लॉजिस्टिक्स कंपन्या आणि आपत्कालीन सेवांना फायदा होईल, असे नितीन गडकरी यांनी सांगितलेय.
नवीन एक्सप्रेसवेमुळे मुंबईहून बंगळुरूला फक्त साडेपाच तासात पोहचता येणार आहे. या महामार्गामुळे पश्चिम आणि दक्षिण भारताला जोडले जाणार आहे. मुंबई आणि बंगळुरू या दोन शहरादरम्यान प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. व्यावसाय आणि पर्यटनाला याचा सर्वाधिक फायदा होणार आहे.
पुणे आणि संभाजीनगर या दोन शहरादरम्यान नवीन ग्रीनफील्ड एक्सप्रेस तयार केला जाणार आहे. या महामार्गामुळे दोन शहरातील अंतर फक्त दोन तासात पूर्ण होणार आहे. या महामार्गाला मंजूरी मिळाली असून लवकरच कामाला सुरूवात होणार असल्याची महिती गडकरींनी दिली आहे. पुण्याहून संभाजीनगरला जोडणारा हा एक्सप्रेसवे मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला जोडला जाणार आहे. त्यामुळे पुण्याहून नागपूर या दरम्यानचा रस्ते प्रवासही वेगवान होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.