कल्याण आणि डोंबिवलीतील नागिरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच कल्याण-डोंबिवलीतून मुंबई आणि नवी मुंबई काही मिनिटातच गाठता येणार आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक व्यवस्था एकमेकांना पूरक पद्धतीने करण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. तसेच यासाठी सविस्तर आराखडा तयार करण्याची संकल्पना त्यांनी गुरुवारी झालेल्या एमएमआरडीएच्या बैठकीत मांडली.
त्यासाठी विशेष बैठकीचे आयोजन करून त्यात सर्व महापालिकांना सामावून घेण्याची मागणी त्यांनी एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांच्याकडे केली. सोबतच ठाणेपल्याडच्या शहरांमध्ये असलेले सर्व प्रमुख मार्ग जोडण्यासाठी रिंग रोड तयार करत नागरिकांना अवघ्या काही मिनिटात शहराबाहेर पडण्यासाठी व्यवस्था निर्माण करण्याची मागणीही यावेळी खासदार शिंदे यांनी केली. त्यावर लवकरच नामांकित सल्लागार समितीची बैठक आयोजित केली जाणार असून यामुळे ठाणेपल्याड वाहतुकीचा चेहरामोहरा बदलणार आहे. तसेच महत्वाकांक्षी मेट्रो १२ ची निविदा येत्या दोन दिवसात जाहीर केली जाणार असून त्याच्याही कामालाही लवकरच सुरुवात होणार आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
कल्याण लोकसभा मतदारसंघासह आसपासच्या परिसरात सुरू असलेल्या वाहतूक प्रकल्पांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात एमएमआरडीएच्या मुख्यालयात आज खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आली होती. या बैठकीत महानगर आयुक्तांसह एमएमआरडीएचे अधिकारी, ठाणे, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर आणि अंबरनाथ या पालिकांचे प्रशासकीय प्रमुख उपस्थित होते. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. (Latest Marathi News)
विस्तारित ठाणे म्हणून ओळख असलेले कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि टिटवाळा ही शहरे विविध राज्यमार्ग किंवा राष्ट्रीय महामार्गाने जोडलेले आहेत. मात्र या शहरांमधून बाहेर पडण्यासाठी शहरांतर्गत मोठा प्रवास करावा लागतो. हा प्रवास टाळून अवघ्या काही मिनिटात वाहन चालकाला महामार्गाला पोहचता यावे, यासाठी ही सर्व शहरे आणि महत्त्वाचे रस्ते रिंग रोडने जोडण्यासाठीची संकल्पना आज खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी बैठकीत मांडली. त्यावर एमएमआरडीए प्रशासनानेही सकारात्मक भूमिका घेतली असून लवकरच या नव्या मार्गाच्या आखणीसाठी नामांकित सल्लागारांची बैठक आयोजित केली जाणार असल्याचे सांगितले. या सर्व शहरांमधून जाणारे मार्ग एकमेकांना जोडले गेल्यास अवघ्या काही मिनिटांत वाहन चालक शहराबाहेर पडू शकेल. सध्या शहरातून महामार्गांवर पोहोचण्यासाठी वाहन चालकाला मोठा वेळ खर्ची घालवा लागतो.
सोबतच मुंबई महानगर प्रदेशात गेल्या काही वर्षात नवनवीन राज्यमार्ग, राष्ट्रीय महामार्ग उभारणी सुरू आहे. या सर्व मार्गांसाठी संलग्नता करणे आवश्यक आहे. ही संलग्नता करण्यासाठी संपूर्ण महानगर प्रदेशाचा स्वतंत्र आराखडा तयार करण्याची गरज आहे, असे सांगत यासाठी एमएमआरडीएने पुढाकार घ्यावा. तसेच या कामी सर्व महापालिकांच्या प्रमुखांना बोलावून त्या संदर्भात बैठक घ्यावी, असे आवाहन खासदार श्रीकांत शिंदे यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत केले. त्यावरही एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी लवकरच ही बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले. या संकल्पनेची अमलबजावणी झाल्यास मुंबई महानगर प्रदेशातील वाहतुकीचा चेहरामोहरा बदलणार आहे.
दरम्यान, कल्याण, डोंबिवली, कल्याण ग्रामीण या भागांना थेट नवी मुंबई, ठाणे आणि मुंबईशी जोडणाऱ्या मेट्रो १२ च्या कामालाही लवकर सुरुवात होणार असून त्याची निविदा येत्या दोन दिवसात जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. मेट्रो १२ चे काम जलद गतीने सुरू असून या निविदे नंतर मेट्रोच्या उभारणीतील महत्त्वाचा टप्पा पूर्ण होणार आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.