Mumbai Local Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Local: मुंबईत धावत्या लोकलमधून तरुणाला ढकललं, किरकोळ वादाचा भयानक शेवट

Mumbai Local Crime: मुंबईमध्ये धावत्या लोकलमधून तरुणाला ढकलून दिले. गोरेगाव- बोरिवली रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडली. आरोपी तरुणाला पोलिसांनी अटक केली.

Priya More
  • मुंबईत किरकोळ वादातून तरुणाला धावत्या लोकलमधून ढकलले

  • गोरेगाव- बोरिवली रेल्वे स्थानकादरम्यान घडली घटना

  • या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला

  • आरोपी तरुणाला पोलिसांनी अटक केली

संजय गडदे, मुंबई

मुंबईत धावत्या लोकलमधून तरुणाला ढकलून दिल्याची धक्कादायक घटना घडली. लोकलच्या दरवाजात उभे राहण्यावरून झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर थेट जीवघेण्या हल्ल्यात झाले. सहप्रवाशाला दरवाजातून आत सरकण्यास सांगितल्याच्या रागातून एका ३० वर्षीय तरुणाने २४ वर्षीय प्रवाशाच्या पाठीवर जोरदार लाथ मारली. त्यामुळे धावत्या लोकलमधून खाली पडून तो गंभीर जखमी झाला. ही धक्कादायक घटना मंगळवारी रात्री गोरेगाव-बोरिवलीदरम्यान घडली. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी नालासोपारा येथील राहुलकुमार पांडे याला अटक केली आहे.

जखमी तरुणाचे नाव तौसिफ शेख असून तो नालासोपारा येथे राहतो. तो कारपेंटर म्हणून काम करतो. मंगळवारी रात्री तौसिफ हा त्याचा सहकारी हुसेन अली याच्यासोबत रात्री ८.४१ वाजताची गोरेगावहून विरारच्या दिशेने जाणारी धीमी लोकल पकडून सामान्य डब्यात दरवाजाजवळ उभा होता.

लोकल कांदिवली स्थानकात पोहोचली असता राहुलकुमार पांडे हा त्याच डब्यात चढला. तो तौसिफ आणि हुसेनसमोर उभा राहिल्यानंतर त्यांच्यात वादाला सुरुवात झाली. लोकल बोरिवली स्थानकाच्या दिशेने जात असताना दरवाजाजवळ गर्दी होऊ नये आणि इतर प्रवाशांना उतरण्यास अडचण होऊ नये, यासाठी तौसिफने पांडेला आत सरकण्यास सांगितले. यावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली.

हुसेन अलीने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाद वाढत जाऊन झटापट सुरू झाली. बोरिवली स्थानकात लोकल पोहोचल्यानंतर ती स्थानकातून सुटत असतानाच पांडेने तौसिफच्या दिशेने जात त्याच्या पाठीवर जोरदार लाथ मारली. या अनपेक्षित हल्ल्यामुळे तौसिफचा तोल गेला आणि तो धावत्या लोकलमधून खाली पडला.

जखमी अवस्थेत तौसिफ बोरिवली स्थानकात पोहोचला. रेल्वे पोलिसांनी त्याला तातडीने प्रथमोपचारासाठी आपत्कालीन वैद्यकीय कक्षात नेले. त्यानंतर पुढील उपचारांसाठी कांदिवली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या डोक्याला टाके घालण्यात आले असून डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. दरम्यान, तौसिफचा सहकारी हुसेन अली याने राहुलकुमार पांडेला रेल्वे पोलिसांच्या चौकीत आणले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत अटक केली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

मध्यरात्री आईला कळले मुलगा रुग्णालयात -

तौसिफ नेहमीच्या वेळेत घरी परतला नाही, तसेच त्याचा मोबाईल खराब असल्याने कुटुंबीयांचा त्याच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे कुटुंबीय चिंतेत पडले होते. मध्यरात्री सुमारे दीडच्या सुमारास त्याच्या आईला तो रुग्णालयात असल्याचे समजले. त्यानंतर कुटुंबीयांनी रुग्णालयात धाव घेतली. दरम्यान, लोकलमधील किरकोळ वादातून प्रवाशाला धावत्या ट्रेनमधून खाली पडावे लागल्याने रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

आठवडाभरातील दुसरी धक्कादायक घटना -

मुंबई उपनगरीय रेल्वेत किरकोळ कारणावरून वाद होऊन प्रवाशाच्या जीवावर बेतल्याची ही एकाच आठवड्यातील दुसरी घटना आहे. मागील आठवड्यात वांद्रे-माहिमदरम्यान दिव्यांगांच्या डब्यातील बसण्याच्या जागेवरून झालेल्या वादात एका ६५ वर्षीय व्यक्तीला धक्का देण्यात आला होता. धावत्या रेल्वेतून खाली पडून गंभीर जखमी झालेल्या या व्यक्तीचा भाभा रुग्णालयात उपचार सुरू करण्यापूर्वीच मृत्यू झाला होता. त्यामुळे लोकलमधील क्षुल्लक वादांना हिंसक स्वरूप देणाऱ्या प्रवाशांवर कठोर कारवाई करण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss : वजन झपाट्याने कमी करण्यासाठी रोज एक वाटी प्या 'ही' डाळ, चविष्ट रेसिपी लिहून घ्या

Banana Vs Dates Benefits: केळी की खजूर? आरोग्यासाठी फायदेशीर काय?

Maharashtra News Live Update: पुण्यातील भोरमध्ये तरुणाची हत्या, चाकूने सपासप वार करत संपवलं

Petrol-Diesel Price: कच्च्या तेलाच्या दरात घसरण, 'या' शहरात पेट्रोल ९८.१० रुपये झाले; तुमच्या शहरातील दर किती?

SBI मध्ये नोकरीचे संधी! ९,००० पेक्षा जास्त पदांची बंपर भरती; पगार किती? जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT