मयूर राणे, मुंबई प्रतिनिधी
कौटुंबिक वादातून रागाच्या भरात नवऱ्याने आपल्या बायकोला धावत्या लोकलखाली ढकलून दिले. या अपघातात महिलेचा मृत्यू झाला. मुंबईतील मुलुंड रेल्वे स्थानकावर ही खळबळजनक घटना घडली आहे. लोकांची गर्दी असताना, स्थानकात गजबज असताना नवऱ्याने धावत्या लोकलखाली महिलेला ढकलले. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अवघ्या २० तासांत आरोपी पतीला बेड्या ठोकल्या आहेत. धक्कादायक म्हणजे, मृत्यूच्या काही तास आधी बायकोनं नवऱ्याविरोधात पोलिसांत तक्रार दिली होती. पण नेमकं हे प्रकरण काय आहे? जाणून घेऊयात...
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला पुष्पा गुप्ता यांना त्यांचा पती राजू गुप्ता हा सतत मारहाण करत होता. या त्रासाला कंटाळून पुष्पा यांनी मुलुंड पोलीस ठाण्यात पतीविरोधात धाव घेऊन तक्रार दाखल केली होती. पत्नीने पोलिसांत तक्रार केल्यामुळे राजू गुप्ता प्रचंड संतापला होता. त्या रागातून त्याने बायकोला रेल्वेखाली ढकलून जीव घेतला.
भारतीय सैन्यात जवान असलेले कमलेश गुप्ता (पुष्पा यांचे दीर) हे पुष्पा यांना सुरक्षिततेसाठी त्यांच्या गावी घेऊन जाण्यासाठी मुलुंडला आले होते. दोघेही गावी जाण्यासाठी मुलुंड रेल्वे स्थानकावर पोहोचले. मात्र, याच वेळी एक धक्कादायक घटना घडली. राजू गुप्ता याने कमलेश यांचे सैन्य दलाचे ओळखपत्र (ID Card) चोरले होते. ते ओळखपत्र परत मिळवण्यासाठी कमलेश पुन्हा मुलुंड येथील घराकडे गेले. राजू गुप्ताने चालाखी करत कमलेश आणि आपला मुलगा आर्यन गुप्ता यांना घरातच कोंडून ठेवले आणि स्वत:मुलुंड स्थानकावर पोहोचला. प्लॅटफॉर्मवर गाडी येताच, रागाच्या भरात असलेल्या राजूने पुष्पा यांना थेट धावत्या लोकलखाली ढकलून दिले. ही घटना इतकी वेगाने घडली की तिथे उपस्थित असलेल्या प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला. अनेकांच्या डोळ्यासमोर पुष्पाचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर आरोपी राजू गुप्ता घटनास्थळावरून पसार झाला होता. रेल्वे पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे रेल्वे पोलिसांनी अवघ्या २० तासांच्या आत राजू गुप्ताला बेड्या ठोकल्या. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून आरोपीवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.