संजय गडदे, मुंबई प्रतिनिधी
Mumbai Goregaon Fire Death Toll : मुंबईतील गोरेगाव पश्चिमेतील भगतसिंग नगर, राजाराम लेन परिसरात शनिवारी (१० जानेवारी २०२६) पहाटे लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील तिघांचा होरपळून मृत्यू झाल्याची अत्यंत दु:खद घटना घडली. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. (Goregaon West Bhagat Singh Nagar fire accident news)
पहाटे ३.०६ वाजता ही आग लागल्याची माहिती मुंबई अग्निशमन दलाला मिळाली. ग्राउंड प्लस एक मजली इमारतीतील तळ मजल्यावरील विद्युत वायरिंग व घरगुती साहित्याला अचानक आग लागली. आगीचे लोळ वेगाने पसरत पहिल्या मजल्यावरील एका खोलीत पोहोचले, जिथे तीन जण झोपेत असताना त्यांच्या कपड्यांनाही आग लागली.
आगीची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखत पाण्याच्या बादल्यांच्या सहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. वीजपुरवठा तात्काळ खंडित करून जवानांनी उर्वरित आग आटोक्यात आणली. ही आग पहाटे ३.१६ वाजता पूर्णपणे विझवण्यात आली.
अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीत अडकलेल्या तिघांना बाहेर काढून तातडीने ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर तिघांनाही मृत घोषित केले. ट्रॉमा केअर रुग्णालयाचे आरएमओ डॉ. मोइन यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये हर्षदा पावसकर (वय १९), कुशल पावसकर (वय १२) आणि संजोग पावसकर (वय ४८) यांचा समावेश आहे.
या दुर्दैवी घटनेने पावसकर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून, परिसरातील नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी विद्युत शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पोलिस व अग्निशमन विभागाकडून घटनेचा पुढील तपास सुरू आहे. या भीषण दुर्घटनेत तीन निरपराध जीव गमावल्याने संपूर्ण परिसर शोकसागरात बुडाला असून, मृतांच्या कुटुंबीयांप्रती सर्व स्तरांतून तीव्र सहवेदना व्यक्त करण्यात येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.