गोरेगावमध्ये ढोल ताशे बंद करण्यास सांगितल्याने तरुणाला मारहाण
गणपती विसर्जन मिरवणुकीत गोरेगावमध्ये मारहाणीची घटना
शिवसेना शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याने केली मारहाण
तरुणाच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर झाले
घटनेनंतर आरोपी दिलीप शर्मा फरार
दीड दिवसांच्या गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीच्या वेळी गोरेगावमध्ये राडा झाला. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेले ढोल-ताशे बंद करण्यास सांगितल्याचा राग अनावर झाल्याने शिवसेना शिंदे गटाचा कार्यकर्ता असलेल्या किक बॉक्सरने एका तरुणाला बेदम मारहाण केली. या तरुणाच्या नाकावर जोरदार हल्ला करण्यात आला आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. गोरेगाव पूर्वेतील मुरारजी मिल परिसरात ही घटना घडली. या मारहाणीत तरुणाच्या नाकाचे हाड तुटल्याचा आरोप असून उपचार आणि शस्त्रक्रियेनंतर त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. याप्रकरणी वनराई पोलिसांनी आरोपी दिलीप शर्मा याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपी सध्या फरार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , गोरेगाव पूर्वेकडील आरे रोड बायपास असलेल्या मुरारजी मिल सोसायटी परिसरात रात्री १० वाजल्यानंतरही मोठ्या आवाजात ढोल-ताशे वाजत असल्याने अद्वैत मडकईकरने आवाज बंद करण्यास सांगितले. ढोल-ताशे बंद करून पुढे जाण्यास सांगितल्याने अद्वैत आणि दिलीप शर्मा यांच्यात वाद झाला. त्यानंतर दिलीप शर्माने अद्वैतच्या नाकावर किक बॉक्सिंग फाईट मारून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे.
या मारहाणीत अद्वैतच्या नाकाला गंभीर दुखापत झाली. त्याच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर झाल्याने रुग्णालयात उपचार तसेच शस्त्रक्रिया करण्यात आली. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर अद्वैतने वनराई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. अद्वैत मडकईकर हा प्रख्यात रंगकर्मी आणि लाईट्स दिग्दर्शक अरुण मडकईकर यांचा मुलगा आहे. दरम्यान, आरोपी दिलीप शर्मा हा काही महिन्यांपूर्वी शिवसेना शिंदे गट गोरेगाव विधानसभा विभाग प्रमुख स्वप्नील टेंबुलकर यांच्या हस्ते पक्षात सहभागी झाल्याची माहिती समोर आली आहे.
मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर दिलीप शर्मा फरार झाला असून, त्याचा शोध घेण्यासाठी वनराई पोलिसांनी दोन पथके रवाना केली आहेत. आरोपीचे लोकेशन मिळवून त्याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. दरम्यान, या घटनेनंतर आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.