सागर आव्हाड, पुणे प्रतिनिधी
Mumbai-Pune Expressway News : पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंकचे काम वेगाने सुरू आहेच. मिसिंग लिंकचे काम अखेरच्या टप्प्यात असताना दुसऱ्या बाजूला द्रुतगती महामार्गाचे रुंदीकरण करण्याचा प्रकल्प एमएसआरडीसीने हाती घेतला आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वे सहा पदरीऐवजी आठपदरी (Mumbai-Pune Expressway to Become 8-Lane) करण्यात येणार आहे. सुमारे ७० किलोमीटर लांबीच्या आठ पदरीकरणासाठी १०० हेक्टर जागेची आवश्यकता आहे. त्यासाठीचा प्रस्ताव सरकारकडे प्रलंबित आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर द्रुतगती महामार्गाची क्षमता वाढणार आहे.
पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावरून दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे. द्रुतगती महामार्गावरून दररोज हजारो वाहने ये- जा करतात. सद्यस्थितीत द्रुतगती महामार्ग सहापदरी आहे, वाहनांची वाढती संख्या पाहाता महामार्ग ८ पदरी करण्यात येणार आहे.
पुणे- मुंबई एक्सप्रेस वे हा ९४ किलोमीटर लांबीचा आहे. खोपोली एक्झिट ते कुसगाव या भागातील १३.३ किलोमीटर पर्यायी रस्ता अर्थात मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम अतिशय वेगाने सुरू आहे. या प्रकल्पांतर्गत १.६७ किलोमीटर आणि ८.९२ किलोमीटर लांबीचे दोन बोगदे आहेत. या दोन्ही बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे, तर आशिया खंडातील सर्वांत मोठ्या पुलाचे काम वेगाने सुरू आहे.
खालापूर टोल ते खोपोली एक्झिटपर्यंत ८ पदरी रस्ता तयार करण्यात येत आहे. त्यामुळे उर्से टोल नाक्यापासून पुढे एक्सप्रेस वे आठपदरी करण्याचा निर्णय एमएसआरडीसीने घेतला आहे. त्यामुळे द्रुतगती महामार्ग सलग आठपदरी होऊन प्रवास विनाअडथळा वेगाने होणार आहे. सद्यस्थितीत याबाबतचा प्रस्ताव शासन स्तरावर मान्यतेच्या प्रतीक्षेत आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.