अक्षय बडवे, पुणे प्रतिनीधी
पुण्यातील बंद पडलेल्या गोडाऊनमध्ये छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या सुगंधित तंबाखू तयार करण्याच्या अवैध कारखान्याचा पुणे पोलिसांच्या दरोडा विरोधी पथकाने पर्दाफाश केला आहे. लोणी काळभोर परिसरातील कदम वाकवस्ती येथे शनिवारी पोलिसांनी छापेमारी करत हा कारखाना उध्वस्त केला. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ११ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, रोहित गुप्ता (वय २६) या तरुणाला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर परिसरातील कदम वाकवस्ती येथे एका पत्र्याच्या बंद पडलेल्या गोडाऊनमध्ये अवैधरित्या सुगंधित तंबाखू तयार करण्याचा कारखाना सुरू असल्याची गोपनीय माहिती पुणे पोलिसांच्या दरोडा विरोधी पथकातील कर्मचारी परेश सावंत आणि सचिन कांबळे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकण्याची योजना आखली.
शनिवारी दरोडा विरोधी पथकाने या गोडाऊनवर छापेमारी केली असता, तेथे मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित सुगंधित तंबाखू आणि मसाला आढळून आला. पोलिसांनी गोडाऊनची अधिक तपासणी केली असता तंबाखू पॅकिंग करण्यासाठी वापरण्यात येणारी मशीन, पिशव्या, पॅकिंग बॉक्स तसेच एक चारचाकी वाहनही आढळून आले. या ठिकाणी अवैधरित्या तंबाखू तयार करून त्याचे पॅकिंग केले जात असल्याचे समोर आले.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी रोहित गुप्ता याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून तंबाखूचा साठा आणि इतर साहित्य असा एकूण ११ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मुद्देमाल जप्त केल्यानंतर पोलिसांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना या कारवाईची माहिती दिली. या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून, या अवैध व्यवसायामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.