Maharashtra Political Crisis Eknath shinde Tweets Shivsena MLA Latter
Maharashtra Political Crisis Eknath shinde Tweets Shivsena MLA Latter 
मुंबई/पुणे

ही आहे आमदारांची भावना...; उद्धव ठाकरेंना उद्देशून लिहिलेलं पत्र एकनाथ शिंदेंनी केलं ट्विट

Jagdish Patil

रश्मी पुराणिक -

मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडखोरीमुळे राज्यातील सरकार धोक्यात येण्याची शक्यता आहे. शिवाय एकनाथ शिंदे यांच्या गोटात सामिल होणाऱ्या आमदारांची संख्या रोज वाढत आहे. काल मुख्यमंत्र्यांनी (Uddhav Thackeray) भावनिक आवाहन करुन देखील आमदार शिवसेना सोडून का जात आहेत असा सवाल सर्वांच्या मनात उपस्थित झाला होता.

अशातच आता एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमदार संजय शिरसाट (Shivsena MLA Sanjay Shirsat) यांनी लिहलेलं पत्र ट्विट केलं आहे. या पत्राद्वारे आपण का नाराज आहोत हे उद्धव ठाकरे यांना सांगण्याचा प्रयत्न केलं आहे. या पत्रात शिरसाट यांनी लिहलं आहे की, 'आमचा विठ्ठल हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे साहेबांना वंदन करून हे पत्र लिहितोय, पत्रास कारण की; 'काल वर्षा बंगल्याची दारं खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांसाठी उघडली. बंगल्यावर झालेली गर्दी पाहून आनंद झाला. ही दारं गेली अडीच वर्ष शिवसेनेचे (Shivsena) आमदार म्हणून आमच्यासाठी बंद होती.

बडव्यांनी आम्हाला डावललं -

आमदार म्हणून बंगल्यात प्रवेश करण्यासाठी, आम्हाला तुमच्या आजूबाजूला असलेल्या, लोकांमधून निवडून न येणाऱ्या, विधान परिषद आणि राज्यसभेत आमच्या जीवावर जाणाऱ्या बडव्यांची मनधरणी करायला लागत होती. हेच so called (चाणक्य कारकून) बडवे आम्हाला डावलून राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीची रणनिती ठरवत होते. त्याचा निकाल काय लागला ते अवघ्या महाराष्ट्राने पाहिले आहे.

शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना स्वपक्षीय आमदार म्हणून वर्षा बंगल्यात आम्हाला कधीही थेट प्रवेश मिळाला नाही. मंत्रालयात सहाव्या माळ्यावर मुख्यमंत्री सर्वांना भेटतात पण आमच्यासाठी तर सहाव्या माळ्याचाही प्रश्न आला नाही कारण तुम्ही मंत्रालयात कधी गेलाच नाही.

मतदारसंघातील कामांसाठी, इतर प्रश्नांसाठी, वैयक्तिक अडचणींसाठी CM साहेबांना भेटायचे आहे अशी अनेक वेळा विनवणी केल्यानंतर वर्षा बंगल्यावर तुम्हाला बोलवलंय असा निरोप बडव्यांकडून यायचा पण तासनतास बंगल्याच्या गेटवर उभं ठेवलं जायचं. बडव्यांना अनेकवेळा फोन केला तर बडवे फोन रिसिव्ह करत नसायचे. शेवटी कंटाळून आम्ही निघून जायचो. तीन ते चार लाख मतदारांमधून निवडून येणाऱ्या आम्हा स्वपक्षीय आमदारांना अशी अपमानास्पद वागणूक का हा आमचा सवाल आहे?

आमची व्यथा बडव्यांनी ऐकून घेतली नाही -

हीच सर्व हाल अपेक्षा आम्ही सर्व आमदारांनी सहन केली. आमची व्यथा, आपल्या आजूबाजूच्या बडव्यांनी ऐकून घेण्याची कधी तसदीही घेतली नाही, किंबहुना आपल्यापर्यंत ती पोहोचवली सुद्धा जात नव्हती. मात्र याचवेळी आम्हाला आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांचा दरवाजा उघडा होता. आणि मतदार संघात असलेली वाईट परिस्थिती, मतदार संघातील निधी, अधिकारी वर्ग, काँग्रेस-राष्ट्रवादीकडून होत असलेला अपमान. आमची ही सर्व गाऱ्हाणी पक्षात फक्त शिंदे साहेबच (Eknath Shinde) ऐकत होते आणि सकारात्मक मार्ग काढत होते. त्यामुळे आमच्या सर्व आमदारांच्या न्याय हक्कासाठी सर्व आमदारांच्या आग्रहाखातर आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना, आम्ही हा निर्णय घेण्यास घ्यायला लावला.

आम्हाला अयोध्येला जाण्यापासून रोखलं -

हिंदुत्व, अयोध्या, राममंदीर हे मुद्दे शिवसेनेचे आहेत ना? मग आता आदित्य ठाकरे अयोध्येला गेले तेंव्हा आम्हाला अयोध्येला जाण्यापासून तुम्ही का रोखलं ? तुम्ही स्वत: फोन करुन अनेक आमदारांना अयोध्येला जाऊ नका असे सांगितले. मुंबई विमानतळावरून अयोध्येला निघालेल्या मी आणि माझ्या अनेक सहकाऱ्यांचे लगेज चेक इन झाले होते, आम्ही विमानात बसणार इतक्यात तुम्ही शिंदे साहेबांना फोन करून सांगितले की आमदारांना अयोध्येला जाऊ देऊ नका आणि जे गेलेत त्यांना तुम्ही स्वत: परत घेऊन या.

शिंदे साहेबांनी आम्हाला लगेच सांगितले की सीएम साहेबांचा फोन आला होता आमदारांना अयोध्येला जाऊ देऊ नका. आम्ही मुंबई विमानतळावर चेक इन केलेले लगेज परत घेतले आणि आपले घर गाठले. राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे एकही मत फुटले नव्हते मग विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर आमच्यावर इतका अविश्वास का दाखवला? आम्हाला रामलल्लांचं दर्शन का घेऊ दिले नाही?

आम्हाला बंद काँग्रेस राष्ट्रवादीला दरवाचे उघडे -

साहेब, जेंव्हा आम्हाला वर्षावर प्रवेश मिळत नव्हता तेंव्हा आमचे खरे विरोधक काँग्रेस राष्ट्रवादीचे लोक तुम्हाला नियमित भेटत होते, मतदारसंघातली कामं करत होते. निधी मिळाल्याची पत्र नाचवत होते. भुमीपुजन आणि उद्घाटनं करत होते, तुमच्यासोबत काढलेले फोटो सोशल मिडियावर व्हायरल करत होते.

त्यावेळी आमच्या मतदारसंघातले लोक विचारायचे की मुख्यमंत्री आपला आहे ना मग आपल्या विरोधकांना निधी कसा मिळतो?त्यांची कामं कशी होतात? तुम्ही आम्हाला भेटतच नव्हता तर आम्ही मतदारांना उत्तर काय द्यायचं या विचाराने जीव कासावीस व्हायचा. या सर्व कठीण प्रसंगात शिवसेनेचं, माननीय बाळासाहेबांचं, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं हिंदुत्व जपणाऱ्या एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला मोलाची साथ दिली.

पाहा व्हिडीओ -

आमच्या प्रत्येक कठिण प्रसंगांत त्यांच्या घराचे दरवाजे आमच्यासाठी उघडे होते, आजही आहेत आणि उद्याची राहतील या विश्वासापोटी आम्ही शिंदे साहेबांसोबत आहोत. काल तुम्ही जे काही बोललात, जे काही झालं ते अत्यंत भावनिक होतं. पण त्यात आमच्या मुळ प्रश्नांची उत्तरं कुठेच मिळाली नाहीत. त्यामुळे आमच्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचवणारं हे भावनिक पत्र लिहावं लागलं. कळावे, लोभ असावा असं या पत्रात लिहलं आहे. त्यामुळे आता आमदारांच्या मनातील खरी खदखद बाहेर यायला लागली आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरी आणि राज्यातील सध्यस्थितीवर भाष्य करण्यासाठी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेना आणि हिंदुत्व एकमेकात गुंफलेले आहेत, ते वेगळे होऊ शकत नाहीत, म्हणूनच एकनाथ शिंदे, आदित्य काही दिवसांपूर्वी अयोध्येला जाऊन आले.

माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्रिपदी नको असेन, तर सूरतला जाऊन का सांगता, बंडखोरांपैकी ज्यांनी मी मुख्यमंत्रिपदी नको असेन, त्यापैकी एकानेही समोर येऊन सांगावं, मी माझ्या राजीनाम्याचं पत्र तयार करुन ठेवतो, मला सत्तेचा मोह नाही, मी आजच माझा मुक्काम वर्षावरुन मातोश्रीवर नेतो,अशी भावनिक साद घातली होती.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Delhi News: दिल्लीत १५ टन बनावट मसाले जप्त; भेसळीत ॲसिड अन् लाकडी भुशाचा समावेश

Kangana Ranaut : लोकसभा निवडणुकीत बाजी मारल्यास काय करणार? कंगना रणौतने सांगितला पुढील प्लान

बुलढाणा : 'डीजे' बंदीनंतर मंगल कार्यालय, लाॅन्ससाठी पाेलिसांची नियमावली; जाणून घ्या सूचना

Today's Marathi News Live : कल्याण लोकसभा मतदारसंघातून रमेश जाधव यांनी घेतली माघार

Premachi Goshta Serial : 'प्रेमाची गोष्ट' मध्या नवा ट्विस्ट; मिहिका मिहीच्या नात्यामध्ये सावनीची सावली?

SCROLL FOR NEXT