जातीपातीचे राजकारण करणाऱ्या विरोधकांना केंद्रीय वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी खडेबोल सुनावले आहे. पिंपरी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शंकर पांडुरंग जगताप यांच्या प्रचारासाठी घेण्यात आलेल्या जाहीर सभेमध्ये नितीन गडकरी बोलत होते. 'निवडणुकीत तुम्हाला चांगला उमेदवार का नको?', असा सवाल यावेळी त्यांनी मतदारांना केला. यावेळी त्यांनी भाजप संविधान बदलेल असं म्हणणाऱ्या विरोधकांचा देखील त्यांनी चांगलाच समाचार घेतला. 'संविधान बदलण्याचे पाप काँग्रेसने केलं.', असं म्हणत नितीन गडकरी संतापले.
'तुम्ही राज्यातील महापुरुषाची जात विचारता का? रेस्टॉरंटमध्ये खायला जाताना रेस्टॉरंट मालकाची जात कोणती आहे किंवा डॉक्टरकडे ऑपरेशनसाठी जाताना डॉक्टरांची जात कोणती आहे असं विचारता का?' मग निवडणुकीत तुम्ही जातीचा विचार का करता? निवडणुकीत तुम्हाला चांगला उमेदवार का नको?', असा सवाल केंद्रीय वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी मतदारांना विचारला आहे.
तसंच, 'जो उमेदवार तुमच्या भविष्य बदलू शकेल, जो तुमच्या आशा - आकांक्षा आणि अपेक्षा पूर्ण करू शकतो. अशा उमेदवाराच्या पाठीशी तुम्ही उभे राहिल्यास तुमचे प्रश्न नक्की सुटणार असा मला विश्वास आहे.', असा टोला नितीन गडकरी यांनी जातीपातीचे राजकारण करणाऱ्या विरोधकांना लगावला आहे.
'मागच्या लोकसभा निवडणुकीत जातीवाद आणि सांप्रदायिकतेचे जहर कालवण्यात आलं. भाजप निवडून आली, तर भाजप संविधान बदलेल असं फेक नरेटीव्ह पसरवण्यात आलं, मात्र आम्ही संविधान बदलणार नाही आणि कुणाला बदलू देणार नाही. संविधान बदलण्याचे पाप हे काँग्रेसने केलं, रायबरेलीच्या निवडणुकीत जेव्हा इंदिरा गांधींच्या विरोधात निकाल आला, त्यावेळी काँग्रेसने फक्त आणीबाणीच लावली नाही, तर संविधानात देखील बदल केले होते आणि १९७७ ला जनता पक्षाचे सरकार आल्यानंतर आम्ही संविधानातले बदल रद्द करून संविधान पूर्ववत केलं.' असा दावा नितीन गडकरी यांनी यावेळी केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.