Eknath Shinde admitted to hospital : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सततचा वाढता कामाचा ताण आणि धावपळीमुळे त्यांना तीव्र ताप आणि प्रचंड अशक्तपणा जाणवू लागल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सध्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे पक्षाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
अधिवेशनादरम्यान प्रकृती बिघडली, आजचे सर्व कार्यक्रम रद्द
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अस्वस्थ वाटू लागले आणि त्यांना ताप आला. गेल्या काही दिवसांपासून राजकीय दौऱ्यांचे आणि बैठकांचे वेळापत्रक अत्यंत व्यस्त असल्याने त्यांच्या शरीरावर प्रचंड ताण आला होता. प्रकृती बिघडताच खबरदारीचा उपाय म्हणून त्यांचे पुढील सर्व नियोजित सार्वजनिक कार्यक्रम तातडीने रद्द करण्यात आले आणि त्यांना ठाण्यातील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले.
मध्यरात्री २ वाजता झाला पक्षप्रवेश
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे राजकीय कार्यक्रमांचे वेळापत्रकही कोलमडले. धुळ्यातील ठाकरे सेनेच्या उपनेत्या शुभांगी पाटील यांचा प्रवेश सोहळा शुक्रवारी संध्याकाळी ४ वाजता ठाण्यातील 'गंगुबाई शिंदे हॉल'मध्ये होणार होता. पण एकनाथ शिंदे यांच्या आजारपणामुळे पुढे ढलावा लागला. मात्र, त्यानंतर मध्यरात्री २ च्या सुमारास खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
'ऑपरेशन टायगर'मुळे वाढली होती धावपळ?
गेल्या काही दिवसांत महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. 'ऑपरेशन टायगर' अंतर्गत ठाकरे सेनेचे ६ खासदार आणि विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी शिंदे गटात प्रवेश केला. या संपूर्ण प्रक्रियेसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सतत दिल्ली आणि मुंबई अशा वाऱ्या कराव्या लागल्या होत्या. या सततच्या प्रवासाचा आणि दगदगीचा त्यांच्या तब्येतीवर परिणाम झाल्याचे बोलले जात आहे. सध्या काळजीचे कोणतेही कारण नसून, त्यांना काही दिवस विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.