संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही, प्रतिनिधी
Maharashtra Political News : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजपचे वरिष्ठ नगरसेवक आणि माजी स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करत पक्षावर टीकेचे बाण सोडले आहेत. यामुळे भाजपमध्ये कल्याण-डोबिंवलीत गटबाजी आणि अंतर्गत वाद असल्याची चर्चा रंगली आहे.
'मी भाजपचा राजीनामा दिल्यानंतरही काही पदाधिकारी माझे फोटो त्यांच्या बॅनरवर लावून नागरिकांमध्ये संभ्रम पसरवत आहेत. ही चुकीची पद्धत थांबवावी. काही महिन्यांपूर्वी विकास निधी न मिळाल्याने म्हात्रे दाम्पत्याने पक्षाला रामराम ठोकला होता. भाजपकडून आश्वासन देण्यात आले होते की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तक्षेपानंतर निधी मिळेल. मात्र चार महिने उलटूनही निधी न आल्याने नाराजी वाढली', असे विकास म्हात्रे यांनी म्हटले.
त्याच दरम्यान नंदू परब यांच्या वतीने शहरभर दिवाळीच्या शुभेच्छा बॅनर्स लावण्यात आले आणि या बॅनर्सवर म्हात्रे दाम्पत्याचे फोटो झळकवण्यात आले. या प्रकारावर आक्षेप घेत विकास म्हात्रे यांनी नंदू परब यांना फोन करून त्वरित बॅनर काढण्याची मागणी केली. काही ठिकाणी बॅनर्स काढण्यात आले पण काही ठिकाणी तसे न झाल्याने विकास म्हात्रे यांनी स्वतः रस्त्यावर उतरून उरलेले बॅनर्स काढले. यावेळी विकास म्हात्रे यांनी 'माझ्या प्रभागात विकास झालेला नाही. म्हणूनच मी भाजपचा राजीनामा दिला' असे सांगितले.
'माझ्या प्रभागातील अनेक विकासकामे दीर्घकाळ प्रलंबित आहेत. मी माझ्या प्रभागातील रखडलेल्या विकासकामांमुळेच भाजपचा राजीनामा दिला. आधी विकासकामे पूर्ण करा, त्यानंतरच मी पुढील राजकीय निर्णयाचा विचार करेन', असे वक्तव्य विकास म्हात्रे यांनी केले आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे केडीएमसी निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.
विकास म्हात्रे हे कल्याण-डोंबिवली परिसरातील प्रभावी आणि सक्रिय नगरसेवक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या नाराजीचा परिणाम स्थानिक राजकारणावर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपच्या अंतर्गत गटबाजी आणि स्थानिक पातळीवरील असंतोषामुळे अनेक ठिकाणी नाराज नेते आणि कार्यकर्ते वेगळा मार्ग अवलंबण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सध्या कल्याण-डोंबिवलीत रंगत आहे. आता विकास म्हात्रे पुन्हा भाजपमध्ये परत येतात की नव्या राजकीय समीकरणांची निर्मिती करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.