Kalyan Dombivli Municipal Corporation 2025-2026 Saam Tv
मुंबई/पुणे

Kalyan Dombivli : केडीएमसी निवडणुकीत नात्यागोत्यांचे राजकारण! भाऊ-बंदकी, पती-पत्नी, मुलगा-मुलगी थेट निवडणूक रिंगणात

Kalyan Dombivli Municipal Corporation 2025-2026 : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणूक २०२५ मध्ये प्रमुख पक्षांकडून नातेवाईकांच्या पॅनल्सना मोठ्या प्रमाणावर उमेदवारी देण्यात आली आहे.

Alisha Khedekar

  • केडीएमसी निवडणूक २०२५ मध्ये सर्वच पक्षांकडून नातेवाईकांना मोठ्या प्रमाणावर उमेदवारी

  • डोंबिवलीत दीपेश-जयेश म्हात्रे या भावांची एकाच पॅनलमधून लढत चर्चेत

  • धात्रक दाम्पत्यासह मुलगी पूजा यांनी मनसेकडून अर्ज भरल्याने कौटुंबिक राजकारण उघड

  • पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांना डावलल्याची भावना; मतदार घराणेशाहीला कसा प्रतिसाद देणार याकडे लक्ष

संघर्ष गांगुर्डे, कल्याण

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीत यंदा विकास, कामगिरीपेक्षा नातेगोत्यांचे राजकारण अधिकच गाजताना दिसत आहे. शिवसेना (शिंदे गट), भाजप, मनसे, राष्ट्रवादी (अजित पवार गट) अशा सर्वच प्रमुख पक्षांनी पती-पत्नी, भाऊ-बहीण, वडील-मुलगी, आई-मुलगा, नातेवाईक यांना मोठ्या प्रमाणावर उमेदवारी दिल्याने पक्षातील जुने, निष्ठावान कार्यकर्ते आणि पदाधिकारी नाराजी व्यक्त करत आहेत.

उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक प्रभागांत घरगुती भाऊबंदकीची राजकीय गणिते उघड झाली. डोंबिवलीतील पॅनल क्रमांक २३ मधून भाजपतर्फे दीपेश म्हात्रे आणि त्यांचे बंधू जयेश म्हात्रे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दोघेही यापूर्वी शिंदे सेना, त्यानंतर उद्धव ठाकरे गट आणि आता भाजपमध्ये आले असून, दोन्ही भावांना एकाच पॅनलमधून उमेदवारी मिळाल्याने चर्चेला उधाण आले आहे. पॅनल क्रमांक ६ मधून शिंदे सेनेतर्फे संजय पाटील आणि त्यांची पत्नी निलीमा पाटील, तर पॅनल क्रमांक २२ मधून विकास म्हात्रे आणि पत्नी कविता म्हात्रे हे पती-पत्नी निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

विशेष म्हणजे विकास-कविता म्हात्रे हे यापूर्वी भाजपमध्ये होते. त्यांनी नुकताच शिंदे सेनेत प्रवेश केला असून, प्रवेशानंतर थेट उमेदवारी मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. भाजपचे माजी नगरसेवक शैलेश धात्रक आणि त्यांची पत्नी माजी नगरसेविका मनिषा धात्रक यांना भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी मनसेकडून पॅनल क्रमांक २५ मधून उमेदवारी दाखल केली आहे. यामध्ये धात्रक दाम्पत्यासह त्यांची मुलगी पूजा धात्रक अशी संपूर्ण कुटुंबीय राजकारणात उतरल्याचे चित्र आहे.

शिवसेना-भाजप युतीतील पॅनल क्रमांक २२ मध्ये जागावाटपावरून नाराजी वाढली आहे. भाजपकडून प्रकाश भोईर आणि अनमोल म्हात्रे यांना उमेदवारी दिल्याने शिंदे सेनेचे संदेश पाटील आणि त्यांची पत्नी रसिका पाटील यांनी मनसेकडून अर्ज भरला आहे. तसेच आधी भाजप, नंतर शिंदे सेना आणि पुन्हा भाजपमध्ये जाणाऱ्या महेश पाटील आणि त्यांची बहीण सुनिता पाटील या दोघांनाही भाजपने उमेदवारी दिली आहे. मनसेतून शिंदे सेनेत गेलेल्या ज्योती मराठे आणि त्यांचा मुलगा सूरज मराठे यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. डोंबिवली पश्चिमेतील पॅनल क्रमांक २१ मधून मनसेचे प्रल्हाद म्हात्रे (वडील) आणि त्यांची मुलगी वेदांगी म्हात्रे हे वडील-मुलगी निवडणूक लढवत आहेत.

कल्याण पूर्वेत भाजप आमदार सुलभा गायकवाड यांच्या जाऊ मनिषा अभिमन्यू गायकवाड यांना पॅनल क्रमांक ११ मधून उमेदवारी देण्यात आली आहे. कल्याण ग्रामीणचे शिंदे सेनेचे आमदार राजेश मोरे यांचे पुत्र हर्षल मोरे यांना प्रभाग क्रमांक २६ मधून उमेदवारी मिळाली आहे. शिंदे सेनेचे कल्याण पश्चिम शहरप्रमुख रवी पाटील यांच्या बहिणी प्रमिला पाटील यांना पॅनल क्रमांक ५ मधून उमेदवारी देण्यात आली आहे.

राष्ट्रवादी (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांचा मुलगा विक्रांत शिंदे पॅनल क्रमांक १२ मधून निवडणूक लढवत आहे. भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या पत्नी हेमा पवार यांना पॅनल क्रमांक ७ मधून उमेदवारी देण्यात आली आहे. शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांच्या पत्नी अस्मिता मोरे यांनाही पॅनल क्रमांक ९ मधून उमेदवारी देण्यात आली आहे. या सर्व घडामोडींमुळे केडीएमसी निवडणूक जनतेच्या प्रश्नांपेक्षा घराणेशाही आणि नातेगोत्यांच्या राजकारणावरच केंद्रित झाली आहे का? असा सवाल उपस्थित होत असून, पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांना डावलले गेल्याची भावना सर्वच पक्षांतून उघडपणे व्यक्त केली जात आहे. निवडणूक निकालातून मतदार या घराणेशाहीला कसा प्रतिसाद देतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bunty Jahagirdar firing Case: श्रीरामपूर हादरलं! जर्मन बेकरी बॉम्ब स्फोटातील आरोपी बंटी जहागीरदारवर गोळीबार

Maharashtra Politics: चंद्रपूरमध्ये मोठी राजकीय घडामोड, भाजपने बड्या नेत्याला पदावरून तडकाफडकी हटवलं

New Year Lucky Zodiac: नवीन वर्षात या राशीचं नशीब चमकणार, जाणून घ्या

Maharashtra Live News Update: भुसावळात शहरात हॉटेल मधील भांडणाच्या कारणावरून गोळीबार

New Year Lucky Zodiac: 2026 वर्ष या ३ राशींसाठी ठरणार खास, पैशांची तंगी होणार दूर; ही तुमची तर रास नाही ना?

SCROLL FOR NEXT