इंस्टाग्रामवर मैत्री करून लग्नाचे आमिष देत ९२ लाखांची फसवणूक
बीएमडब्ल्यू, दागिने, मोबाईल दाखवत मॉडेल असल्याचे खोटे दावे
पोलिसांनी आरोपीला अटक करून दागिने आणि वाहने जप्त केली
आरोपीविरुद्ध यापूर्वीही अशाच गुन्ह्यांच्या तक्रारी दाखल
संघर्ष गांगुर्डे, डोंबिवली
डोंबिवलीतून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इन्स्टाग्रामवर मैत्री करून महागड्या बीएमडब्ल्यूसारख्या गाड्यांची रेलचेल दाखवत स्वतःला मॉडेल व रील स्टार म्हणून सादर करणाऱ्या शैलेश प्रकाश रामुगडे याला विष्णूनगर पोलिसांनी गजाआड केले आहे. तरुण मुलींना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम उकळणाऱ्या या आरोपीविरुद्ध ९२ लाख ७५ हजार रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ३० वर्षीय तरुणीशी इंस्टाग्रामवर ओळख वाढवत रामुगडेने तिचा विश्वास संपादन केला. स्वतःच्या घरावर ईडीची धाड पडून २ किलो सोने आणि १ कोटी रुपये जप्त झाल्याचे खोटे सांगत तो अडचणीत असल्याचे फिर्यादीस भासवले. गेलेलं सोनं आणि पैशांची सुटका करण्यासाठी पैसे लागणार असल्याचे सांगून वेळोवेळी तिच्याकडून बँक खात्यातून तसेच गुगलपे द्वारे रोख रक्कम घेतली.
फिर्यादीकडे पैसे नसल्याचे समजताच तिच्याकडील तसेच घरातील सोन्याचे दागिने देण्यास भाग पाडण्यात आले. हे दागिने घेऊन काही दिवसांत परत सोडवून देण्याचे आश्वासन रामुगडेने दिले. मात्र पैशांसह दागिन्यांचा अपहार केला. या प्रकारात फिर्यादीकडून एकूण ५१,५०,००० रुपये रोख आणि लाखो किमतीचे सोन्याचे दागिने असा एकूण ९२,७५,००० रुपयांचा गंडा घातल्याचे निष्पन्न झाले आहे.
फिर्यादीच्या तक्रारीवरून विष्णूनगर पोलीस ठाण्यात ५ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत चौकशी करून अटक केली. सोनारांकडून दागिने, चार महागडे मोबाईल, बीएमडब्ल्यू कार जप्त तपासात आरोपीने फसवणुकीत मिळालेले दागिने ठाण्यातील तीन सोनारांकडे गहाण ठेवल्याचे समोर आले. तेथून ३७ तोळे सोन्याचे दागिने (किंमत १२,१५,७४० रुपये) हस्तगत करण्यात आले. याचबरोबर आरोपीकडून चार महागडे मोबाईल फोन व गुन्ह्यात वापरलेली बीएमडब्ल्यू कार पोलिसांनी जप्त केली आहे. उर्वरित मालाचा तपास सुरु आहे.
कापूरबावडी पोलिस ठाण्यात देखील याच आरोपीविरुद्ध तरुणींना फसवणुकीचे दोन गुन्हे आधीच दाखल आहेत. सोशल मीडियावर मैत्री करून महागड्या गाड्यांचा दिखावा, मॉडेलिंगचा ग्लॅमर, भविष्यातील लग्नाचे आश्वासन देऊन तो मुलींना भावनिकदृष्ट्या ब्लॅकमेल करत मोठी आर्थिक फसवणूक करत असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. विष्णूनगर पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून आणखी पीडित समोर येण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.