Lokmanya Tilak great grandson Death : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे पणतू डॉ. दीपक टिळक यांचं पुण्यामध्ये दु:खद निधन झाले आहे. पुण्यातील राहत्या घरीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मागे मुलगा, मुलगी नातवंडे असा परिवार आहे. आज सकाळी 8 ते 11 या वेळेत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी टिळकवाड्यात ठेवण्यात येणार आहे. दुपारी बारानंतर वैकुंठ स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
'केसरी'चे विश्वस्त संपादक, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि लोकमान्य टिळक यांचे पणतू डॉ. दीपक टिळक यांनी शिक्षण, पत्रकारिता, सामाजिक कार्य या क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान दिले. टिळक कुटुंबाच्या सामाजिक कार्याचा वारसा त्यांनी प्रामाणिकपणे पुढे नेत, 'केसरी'सारख्या ऐतिहासिक दैनिकाच्या माध्यमातून राष्ट्रभक्ती, मूल्याधिष्ठित विचार आणि लोकशिक्षणाचा ध्यास जपला.
डॉ. दीपक टिळक यांनी ट्रस्टच्या माध्यमातून लोकमान्य टिळकांचा स्वातंत्र्यलढ्यातील आणि सामाजिक सुधारणांचा वारसा जपण्याचे कार्य केले. त्यांनी सामाजिक आणि सांस्कृतिक मूल्यांना चालना देण्यासाठी योगदान दिले, तसेच पुरस्कार सोहळ्याद्वारे राष्ट्रीय नेतृत्वाला प्रोत्साहन दिले. त्यांच्या कार्यामुळे पुण्यातील टिळक स्मारक मंदिर हे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक केंद्र म्हणून ओळखले जाते. दीपक टिळक यांनी काही काळ टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून काम पाहिलेय.
कोण होते डॉ. दीपक टिळक?
डॉ. दीपक टिळक हे लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष आणि स्वातंत्र्यसैनिक बाळ गंगाधर टिळक यांचे पणतू होते. त्यांचे वडील जयंतराव टिळक यांनी हिंदू महासभेतून राजकीय कारकीर्द सुरू केली होती. त्यानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश करून राज्यसभेचे खासदार आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष झाले.
डॉ. दीपक टिळक यांनी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराची परंपरा पुढे नेली. 1983 पासून दरवर्षी 1 ऑगस्टला लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीला दिली जाते. हा पुरस्कार उल्लेखनीय नेतृत्वासाठी प्रदान केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी (2023), माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी, अटल बिहारी वाजपेयी यांच्यासह अनेक दिग्गजांना हा पुरस्कार देण्यात आलाय. पुरस्काराचे स्वरूप एक लाख रुपये, मानचिन्ह आणि पुणेरी पगडी असे आहे.
जपानी भाषेच्या प्रसारासाठी डॉ. दीपक टिळक यांनी केलेल्या कार्याची जपान सरकारनेही दखल घेतली होती. तसेच, लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचे समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांचे कार्य हे नव्या पिढीसाठी प्रेरणादायी होते. ते एक विचारवंत, कुशल प्रशासक, संवेदनशील पत्रकार आणि समर्पित समाजसेवक होते. त्यांच्या जाण्याने पुणे शहराच्या सार्वजनिक जीवनात पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या परिवाराच्या दुःखात मी सहभागी आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.अजित पवार, उपमुख्यमंत्री
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.