घाटकोपरमधील पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळून (Ghatkopar Hoarding Collapse Case) झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत १४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेमध्ये ७४ जण जखमी झालेत. यामधील ४३ जणांवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर ३१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जखमींमधील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली असून जखमींना सरकारमार्फत मोफत उपचार केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. आता या दुर्घटनेतील जखमींना देखील सरकारकडून मदत जाहीर करण्यात आली आहे.
मुंबईचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आज घाटकोपर येथील दुर्घटनास्थळाला भेट दिली. त्याचसोबत त्यांनी राजावाडी रुग्णालयामध्ये जाऊन जखमी आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना मंगल प्रभात लोढा यांनी जखमींसाठी मदतीची घोषणा केली. या दुर्घटनेमध्ये किरकोळ जखमी झालेल्यांना ५० हजार रुपयांची मदत मिळणार आहे. ६० टक्क्यांपर्यंत अपंगत्व आलेल्यांना ७५ हजार रुपये मदत म्हणून सरकार देणार आहे. तर ६० टक्क्यांहून अधिक अपंगत्व आलेल्यांना अडीच लाख रुपये देण्यात येणार आहेत.
घाटकोपरच्या इस्टर्न एक्स्प्रेस हायवेलगत पोलिस ग्राऊंडच्या शेजारी असलेल्या पेट्रोल पंपावर सोमवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास अचानक मोठे होर्डिंग कोसळले. वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे हे होर्डिंग कोसळले. मुसळधार पावसामुळे पेट्रोल पंपाच्या आडोशाला अनेक जण आपली वाहनं घेऊन उभी होती. तर काही वाहन चालक याठिकाणी पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी गॅस भरण्यासाठी आले होते. अशामध्ये अचानक पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळल्यामुळे हे सर्वजण त्याखाली दबले गेले. या दुर्घटनेमध्ये पेट्रोल पंपाचे मोठे नुकसान झाले. त्याचसोबत अनेक वाहनांचे देखील नुकसान झाले.
या दुर्घटनेनंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळाला भेट देत पाहणी केली. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर केली. त्याचसोबत जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च राज्य सरकार करेल अशी घोषणा केली होती. त्याचसोबत हे अनधिकृ होर्डिंग लावणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असे त्यांनी सांगितले होते. या सोबतच मुंबईतील सर्व होर्डिंगचे सर्वेक्षण करून लायसन्स नसणाऱ्यांविरोधात कारवाईच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.