मुंबई: भाजपचे नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांच्याविरोधात आर्थिक गुन्हे शाखेने मंगळवारी गुन्हा (FIR) दाखल केला आहे. कर्ज बुडवल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कंबोज यांच्या कंपनीने २०११ ते २०१५ या कालावधीत इंडियन ओव्हरसिज बँकेकडून ५२ कोटी रुपयांचे कर्ज (Loan) घेतले होते. पण ते कर्ज ज्या कारणासाठी घेतले होते, त्यासाठी त्याचा न वापर करता ती रक्कम इतर ठिकाणी वापरण्यात आल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. (FIR Filed Against BJP Leader Mohit Kamboj For Loan Fraud In Mumbai)
हे देखील पाहा -
कंबोज यांनी ते कर्ज बुडवले होते. याप्रकरणी कंबोज आणि त्यांच्या कंपनीच्या दोन संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणूक व कट रचल्याचा त्यांच्याविरोधात आरोप ठेवण्यात आला आहे. कंबोज यांनी स्वतः ट्वीट करून त्यांच्याविरोधातले आरोप फेटाळले आहेत. (Mohit Kamboj Latest Marathi News)
मोहित कंबोज म्हणाले की, "मला कळालं मुंबई पोलिसांनी माझ्याविरोधात एफआयआर दाखल केली आहे. एक जुनी कंपनी जी २०१७ मध्ये बंद झाली आहे. त्याचे बॅंक इश्यूज काढून माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे. मला असं वाटतं की, महाविकास आघाडी सरकार असं करुन माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असेल किंवा मला धमकावण्याचा प्रयत्न करत असेल तर तसं होणार नाही. हे नवाब मलिकांचं काम असेल किंवा संजय राऊतांच काम असेल तर मी याच्याविरोधात कोर्टात कायदेशीर लढा देईन. आम्ही याला घाबरणार नाही" असं म्हणत कंबोज यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत.
Edited By - Akshay Baisane