संजय गडदे, साम टीव्ही
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी) आणि सिटीफ्लो यांच्या संयुक्त उपक्रमातून मेट्रोमार्ग ३ (अॅक्वा लाईन) प्रवाशांसाठी विशेष फीडर बससेवा सुरू करण्यात आलीये. या सेवेमुळे प्रवाशांना प्रमुख स्थानकांवरून सहज आणि सोयीस्कर प्रथम आणि अंतिम प्रवास सुविधा उपलब्ध होणार आहेत. ही फीडर बस सेवा सुरुवातीला तीन प्रमुख मेट्रो स्थानकांवर उपलब्ध असणार आहे.
बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC), वरळी आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) या महत्त्वाच्या व्यावसायिक आणि निवासी भागांमध्ये सुलभ संपर्क साधता येईल.
BKC मध्ये, मार्ग NSE, Jio गार्डन, वन BKC आणि कौटुंबिक न्यायालय यांसारख्या प्रमुख ठिकाणांवरून जाईल.
वरळीमध्ये सेवा सेंच्युरी मिल्स, वन इंडिया बुल्स सेंटर, कमला मिल्स आणि पेनिन्सुला कॉर्पोरेट पार्क यांना कव्हर करेल.
CSMT मध्ये मार्ग जुना कस्टम हाऊस, लायन्स गेट, एस.पी. मुखर्जी चौक, के.सी. कॉलेज आणि चर्चगेट मेट्रो स्थानकाशी जोडला जाईल.
गर्दीच्या वेळी या बस दर १० मिनिटांनी धावतील. सुरुवातीचे भाडे प्रति प्रवास ₹२९ असून मासिक पास ₹४९९ मध्ये उपलब्ध आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी तिकिट खरेदीची सुविधा सिटीफ्लो अॅप तसेच मेट्रोकनेक्ट३ अॅपवर एकत्रित स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.
“मेट्रो मार्ग ३ मुंबईच्या सार्वजनिक वाहतुकीत नवे पर्व घेऊन आली आहे. प्रवास अधिक सुलभ व्हावा यासाठी विश्वसनीय फीडर सेवा तितकीच महत्त्वाची आहे. सिटीफ्लोच्या माध्यमातून ही सेवा प्रवाशांच्या दारापर्यंत मेट्रोच्या सोयीचा विस्तार करेल,” असे आर. रमणा, संचालक (नियोजन व रिअल इस्टेट विकास / एनएफबीआर), एमएमआरसी यांनी सांगितले.
'मुंबईसाठी एकात्मिक प्रवासव्यवस्था तयार करण्याच्या या उपक्रमाचा भाग होणे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. या फीडर मार्गांमुळे नागरिकांना शाश्वत, सामायिक आणि तंत्रज्ञानाधारित प्रवास पद्धतीकडे वळण्यास प्रोत्साहन मिळेल,” असे सिटीफ्लोचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेरिन वेनाड यांनी सांगितले.
एमएमआरसी आणि सिटीफ्लो यांचा हा उपक्रम मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेच्या एकत्रीकरणातील महत्त्वाचे पाऊल ठरतो आहे. यामुळे खासगी वाहनांवरील अवलंबित्व कमी होईल आणि स्वच्छ, शाश्वत व आधुनिक शहराच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल टाकले जाईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.