Mask Rules in Mumbai Today : गेल्या काही दिवसांपासून देशातील विविध राज्यांमध्ये कोरोना संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे.मुंबई महानगरपालिका क्षेत्रात देखील मागील काही दिवसांमध्ये रुग्णसंख्या वाढली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अंदाजानुसार मे महिन्यामध्ये कोविड संसर्ग बाधितांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेची सर्व रुग्णालये, तसेच सर्व खासगी रुग्णालयांनी देखील कोविड उपचारांसाठी सुसज्ज रहावे, अशी सूचना मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी केली आहे.
विशेषतः ६० वर्षे वयावरील ज्येष्ठ नागरिकांना सक्ती नसली तरी त्यांनी गर्दीच्या ठिकाणी वावरताना खबरदारीचा उपाय म्हणून मास्क लावणे आवश्यक आहे. मात्र महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये सर्व कर्मचारी, रूग्ण तसेच येणाऱ्या अभ्यागतांना यापुढे मास्क लावणे सक्तीचे असेल, असेही निर्देश चहल यांनी दिले.
कोविडच्या वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील आरोग्य व्यवस्थेच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी आज (दिनांक १० एप्रिल) तातडीची आढावा बैठक घेतली. प्रशासकीय अधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी महानगरपालिका आयुक्त श्री. चहल म्हणाले की, केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने कोविड रूग्णसंख्या वाढीबाबतचा वर्तवलेला अंदाज पाहता संपूर्ण यंत्रणेने सज्ज राहण्याचा सल्ला सरकारने दिला आहे. सक्ती नसली तरी काही मार्गदर्शके खबरदारीचा उपाय म्हणून निर्गमित करावयाची आहेत.
वैद्यकीय अंदाजानुसार येत्या मे महिन्यामध्ये कोविड संसर्गाच्या रूग्णांची संख्या वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे, मुंबईतील महानगरपालिकेच्या सोबतच खासगी रुग्णालयांच्या ठिकाणीही रूग्णशय्या सज्ज ठेवणे आवश्यक आहे, असे सांगून आयुक्तांनी विविध सूचना याप्रसंगी केल्या. त्या संक्षिप्तपणे पुढीलप्रमाणे आहेत.
१. औषध इत्यादी खरेदी- महानगरपालिकेच्या मध्यवर्ती खरेदी खात्याने महानगरपालिकेची सर्व रुग्णालये मिळून आवश्यक असणारे ग्लोव्हज्, मास्क, पीपीई कीट्स त्याचप्रमाणे औषधसाठा व इतर वैद्यकीय सामुग्री यांचा आढावा घेवून त्यांची आवश्यकता असल्यास खरेदीची प्रक्रिया सुरु करावी, कोणत्याही बाबीचा तुटवडा भासणार नाही, याची खातरजमा करण्यात यावी.
२. कोविड चाचण्या- कोविड संसर्ग बाधित रूग्ण वेळीच शोधून काढले तर संसर्गाला अटकाव करता येतो, त्यामुळे कोविड चाचण्यांची संख्या वाढवावी, परिणामी उपचार करणे सोपे जाते. चाचण्यांची संख्या वाढवतानाच खासगी प्रयोगशाळा संचालकांची अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी लवकरात लवकर बैठक घ्यावी.
३. वैद्यकीय प्राणवायू- कोविड रुग्णसंख्या वाढल्यास अतिदक्षता उपचारांची आवश्यकता वाढू शकते. हे लक्षात घेवून सर्व रूग्णालयांच्या ठिकाणी असलेले वैद्यकीय प्राणवायू निर्मिती (ऑक्सिजन प्लांट) सुस्थितीत कार्यरत आहेत, ऑक्सिजनची मागणी व पुरवठा यांचा ताळमेळ आहे, या सर्व बाबींचे परीक्षण (ऑडिट) रुग्णालयांनी करावे.
४. विभागीय नियंत्रण कक्ष (वॉर्ड वॉर रूम) – कोविडच्या यापूर्वीच्या लाटांमध्ये रूग्ण व्यवस्थापनात महत्त्वाची भूमिका पार पाडणारे सर्व विभागीय नियंत्रण कक्ष (वॉर्ड वॉर रुम) यांच्या कामकाजाचा तातडीने फेरआढावा घ्यावा आणि कोणत्याही प्रकारच्या स्थितीचा सामना करण्यासाठी आवश्यक ते सर्व मनुष्यबळ, यंत्रणेसह ते कार्यरत राहतील, याची दक्षता घ्यावी. नागरिकांना कोविड काळात तत्काळ प्रतिसाद मिळतानाच आवश्यक असलेली मदत देण्यासाठी विभागीय नियंत्रण कक्षाची जबाबदारी महत्वाची असेल.
५. कोविड रुग्णांची संख्या कमी करणे यासाठी कोविड जागरुकता महत्त्वाची असल्याने जनजागृतीवर भर द्यावा.
६. कोविडच्या वाढत्या रुग्णसंख्येमध्ये ६० वर्षे वयावरील ज्येष्ठ नागरिकांना अधिक धोका असल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रामधील ६० वर्षेपेक्षा अधिक वयाच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांनी, त्याचप्रमाणे सहव्याधी असलेल्या नागरिकांनी मास्कचा सातत्याने उपयोग करणे हे त्यांच्यासाठी सुरक्षित ठरेल. त्यांना मास्कची सक्ती नसली तरी खबरदारी घेणे हे अधिक योग्य आहे. शक्यतो, सार्वजनिक व गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करावा. त्याबाबतची सूचना आरोग्य विभागाकडून तातडीने प्रसारित करण्यात यावी.
७. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱयांना देखील सक्ती नसली तर जनतेशी येणारा संपर्क पाहता, त्यांनी मास्कचा यापुढे उपयोग करावा. महानगरपालिका कार्यालयांमध्ये येणाऱया अभ्यागतांना देखील मास्क लावण्याची नम्रपणे विनंती करावी.
८. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व रूग्णालयांमधील सर्व कर्मचारी, रुग्ण तसेच अभ्यागतांना देखील मास्क लावणे हे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सक्तीचे करण्यात येत आहे. त्याबाबतची सूचना आरोग्य विभागाकडून तातडीने प्रसारित करण्यात यावी.
९. मुंबईतील महानगरपालिकेची रुग्णालये व खासगी रुग्णालये यांनी कोविड पूर्वसज्जतेचा भाग म्हणून रंगीत तालीम (मॉक ड्रिल) करावी, ही रंगीत तालीम करताना केंद्र सरकारच्या सुचनेनुसार आवश्यक ती सर्व कार्यवाही करण्यात यावी.
१०. मुंबईतील सर्व खासगी रुग्णालयांनी देखील कोविड बाधितांवर उपचारांसाठी संपूर्ण यंत्रणा सुसज्ज करावी, वाढत्या रुग्णसंख्येची गरज लक्षात घेवून कोणतीही कमतरता राहणार नाही, याची काळजी घ्यावी.
११. सर्व रूग्णालयांमध्ये शस्त्रक्रियेला सामोरे जाणाऱया रुग्णांची कोविड चाचणी करण्यात यावी. जर असा रुग्ण कोविड बाधित आढळला आणि जर शस्त्रक्रिया आपत्कालीन स्वरुपाची नसेल तर ती शस्त्रक्रिया पुढे ढकलावी.
१२. कोविड बाधित तसेच लक्षणं विरहीत रुग्ण लक्षात घेता, आरोग्य खात्याने कोविड रूग्णांच्या गृह विलगीकरण (होम आयसोलेशन) संदर्भात नव्याने मार्गदर्शक सूचना प्रसारित कराव्यात.
१३. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यांमध्ये औषधे आदींची उपलब्धता राहील, याची काळजी घ्यावी. संबंधित विभाग कार्यालयांच्या सहायक आयुक्तांनी देखील आपला दवाखान्यांमधील औषधसाठा, मनुष्यबळाची नेमणूक याबाबतचा आढावा घ्यावा.
१४. पावसाळापूर्व नाल्यांमधून गाळ काढणे, इतर विविध कामे, रस्त्यांची कामे तसेच दुरुस्ती इत्यादी सर्व कामे पावसाळ्यापूर्वी ठरवलेल्या वेळेत पूर्ण करण्यात यावीत. त्यासाठी सर्व संबंधित सहआयुक्त, उपआयुक्त, सहायक आयुक्त, खातेप्रमुख यांनी आढावा घेवून प्रत्यक्ष अंमलबजावणीकडे लक्ष पुरवावे.
१५. महिला व बालकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱया मातृशक्ती महिला मेळाव्यांच्या आयोजनासाठी विभाग कार्यालय स्तरावर समन्वय अधिकारी नेमले गेले आहेत, याची खातरजमा करावी.
१६. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प), उपआयुक्त (पायाभूत सुविधा) यांनी रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरणासह पावसाळापूर्व कामांचा नियमितपणे आढावा घ्यावा.
१७. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) यांनी स्वच्छतादुतांची नेमणूक आणि नवीन सार्वजनिक प्रसाधनगृहांची उभारणीबाबतचा आढावा घ्यावा.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.