मुंबई: शिवसेनेचा दसरा मेळावा (Dasara Melava) येत्या ५ ऑक्टोबरला आहे. ठाकरे आणि शिंदे गट या दोघांचा वेगवेगळा मेळावा होत आहे. यानिमित्ताने राज्यातील राजकारण तापलं आहे. तर आपणच बाळासाहेबांचे खरे वारसदार आणि हिंदुत्ववादी कसे आहोत. हे सांगण्याचा दोन्ही गटांकडून वारंवार प्रयत्न होत आहे.
यासाठी दोन्ही गटांकडून जाहीरातबाजी सुरु आहे. तर ठाकरे गटाच्या शिवसेनेने मेळाव्याचे 3 टिझर प्रदर्शित केले आहेत. अशातच आता राज्याचे मुख्यमंत्री आणि बंडखोरांच्या गटाचे सर्वेसर्वा एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी देखील शिवसैनिकांना आपल्या मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी आवाहन करणारे एक पत्र लिहलं आहे. शिवाय बाळासाहेबांचे प्रखर हिंदुत्ववादी विचारांची परंपरा मानणाऱ्या कट्टर शिवसैनिकांचा मेळावा बीकेसी मैदान बांद्रा येथे होणार असल्याचा दावा त्यांनी या पत्राद्वारे केला आहे.
मुंख्यमंत्र्यानी लिहलेलं पत्र पुढीलप्रमाणे -
महाराष्ट्राचं आराध्य दैवत आई भवानी आणि हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज ह्यांना मानाचा मुजरा. हिंदुस्थानाच्या जाज्वल्य परंपरांचा प्रत्येक भारतीयास अभिमान आहेच. तसाच महाराष्ट्रातील एका परंपरेचा देखील प्रत्येक मराठी मनास अभिमान आहे. ती परंपरा म्हणजे शिवसेनेचा दसरा मेळावा हिंदुहृदयसम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) ह्यांनी या परंपरेची सुरुवात केली.
गेली अनेक दशके देशाला पोखरून काढणारी स्वार्थी प्रवृत्ती उपटून टाकण्याची खरी सुरुवात ह्या मेळाव्यातून झाली. शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे ह्यांचे प्रखर हिंदुत्ववादी विचार हीच परंपरा मानणाऱ्या कट्टर शिवसैनिकांचा मेळावा ह्या वर्षी बीकेसी मैदान बांद्रा मुंबई येथे संपन्न होणार आहे.
विचारांचे सोने लुटण्याची ही परंपरा त्यांचे सर्व एकलव्य समान शिष्य 'विचारांचे वारसदार' म्हणून पुढे नेणार आहेत. हिंदवी तोफ बंधमुक्त होऊन पुन्हा धडाडणार आहे. आपणही ह्या स्वाभिमानी सोहळ्यात सहभागी व्हावे ही नम्र विनंती. जय हिंद ! जय महाराष्ट्र ! वंदे मातरम ! कळावे. असा मजकूर या पत्रात लिहला आहे. त्यामुळे यंदाचा दसरा मेळाव्यासाठी दोन्ही गट सज्ज झाल्याचं दिसून येत आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.