सिडकोने प्रथमच FCFS तत्त्वावर ४५०८ घरांची योजना जाहीर करण्यात आलीय.
तळोजा, द्रोणागिरी, घणसोली, खारघर, कळंबोली येथे PMAY अंतर्गत घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
अर्जदारांना स्वतः पसंतीची सदनिका निवडता येणार आहे.
गणेश कवडे, साम प्रतिनिधी
सिडकोच्या इतिहासात प्रथमच "प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य" तत्त्वावर ४.५०८ घरांची गृहनिर्माण योजना जाहीर करण्यात आली आहे. शनिवारी २२ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ०४.०० वाजेपासून योजनेच्या ऑनलाइन अर्ज नोंदणीस सुरुवात होणार आहे. या योजनेंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गट यांकरिता नवी मुंबईतील तळोजा, द्रोणागिरी, घणसोली, खारघर आणि कळंबोली येथील सिडकोच्या गृहसंकुलांतील ४,५०८ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्यात. अर्जदारांना प्रथमच स्वत:च्या पसंतीची सदनिका निवडण्याचे स्वातंत्र्य हे या योजनेचे प्रमुख वैशिष्ट्य असणार आहे.
“सिडकोच्या सोयी सुविधांनी सुसज्ज गृहसंकुलांतील ४,५०८ सदनिका या योजनेद्वारे उपलब्ध करून देण्यात आल्यात. या योजनेकरिता सोडत किंवा लॉटरी नसून आपल्या पसंतीची सदनिका निवडण्याचे स्वातंत्र्य अर्जदारांना देण्यात आले आहे. यामुळे त्यांना आपल्या स्वप्नातील घर साकारता येणार आहे.
पुन्हा एकदा सर्वसामान्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या व देशातील सर्वाधिक वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपैकी एक असलेल्या नवी मुंबईमध्ये आपले घर घेण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. याकरिता अधिकाधिक नागरिकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आपण आवाहन करतो, असं विजय सिंघल उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको म्हणालेत.
सिडकोतर्फे सातत्याने विविध आर्थिक उत्पन्न गटांतील नागरिकांकरिता गृहनिर्माण योजनांद्वारे परवडणाऱ्या दरातील घरे उपलब्ध करून देण्यात येतात. या योजनेंतर्गत तळोजा, द्रोणागिरी, घणसोली, खारघर आणि कळंबोली येथील सिडकोच्या गृहसंकुलांतील उर्वरित ४,५०८ सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. एकूण ४,५०८ सदनिकांपैकी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाकरिता १,११५ तर अल्प उत्पन्न गटाकरिता ३,३९३ सदनिका उपलब्ध आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या सदनिकांकरिता प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत रु. २.५० लाख अनुदान उपलब्ध आहे.
सदर योजनेतील सदनिका या तयार (रेडी टू मूव्ह) असून अर्जदारांना त्यांच्या पसंतीची सदनिका निवडण्याचे स्वातंत्र्य आहे. ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर सदनिकांची विक्री करण्यात येणार आहे. सदनिकेच्या किंमतीच्या संपूर्ण रकमेचा भरणा केल्यानंतर अर्जदारांना लगेच सदनिकेचा ताबा देण्यात येणार आहे. कागदपत्रांची तपासणी पूर्ण झाल्यानंतर पात्र अर्जदारांना त्यांच्या पसंतीची सदनिका निवडण्याची संधी मिळणार आहे.
या योजनेतील सर्व गृहसंकुले ही नवी मुंबईतील विकसित नोडमध्ये आहेत. या परिसरामध्ये सर्व मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध आहेत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापासून नजीच्या अंतरावर असलेल्या या गृहसंकुलांना उपनगरीय रेल्वे, मेट्रो आणि महामार्ग यांद्वारे उत्तम कनेक्टिव्हिटी लाभली आहे.
ऑनलाइन अर्ज नोंदणीकरिता cidcofcfs.cidcoindia.com हे संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. योजनेचा सविस्तर तपशील देण्यात आलाय. सदनिकेचे क्षेत्रफळ, किंमत इ. देखील सदर संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. ऑनलाइन अर्ज नोंदणी दि. २२ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी चार वाजेपासून सुरू होणार आहे. दि. २१ डिसेंबर २०२५ पर्यंत नोंदणी केलेल्या पात्र अर्जदारांना दि. २८ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजेपासून त्यांच्या पसंतीच्या सदनिकेची निवड करता येणार आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर सदनिकांची विक्री केली जाणार असल्याने अर्जदारांनी उपरोक्त कालावधीमध्ये, लवकरात लवकर अर्ज करून आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करावे, असे आवाहन सिडकोतर्फे करण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.