मुंबई : पुराव्याशिवाय पतीची बदनामी करणे, त्याला व्यभिचारी आणि मद्यपी म्हणणे म्हणजे क्रूरता होय, असे मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) एका प्रकरणात म्हटले आहे. यासह पुण्यातील एका दाम्पत्याचा कौटुंबिक न्यायालयाने केलेला घटस्फोट उच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. न्यायमूर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.
काय आहे प्रकरण?
पुण्यातील ५० वर्षांची महिला आणि तिचा नवरा (Husband-Wife) यांच्यातील घटस्फोटाचा खटला पुण्यातील कौटुंबिक न्यायालयात सुरू होता. या प्रकरणात कौटुंबिक न्यायालयाने घटस्फोटाला मान्यता दिली. याविरोधात महिलेने मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली होती. ही सुनावणी सुरू असतानाच पतीचे निधन झाले. त्यामुळे पतीचे वारस यांना प्रतिवादी करण्यात आले होते.
महिलेने आपल्या अपीलमध्ये दावा केला की, तिचा नवरा व्यभिचारी आणि मद्यपी होता. या दुष्कृत्यांमुळे तिला तिच्या वैवाहिक हक्कांपासून वंचित ठेवण्यात आले होते. पत्नीने पतीच्या चारित्र्यावर अन्यायकारक आणि खोटे आरोप करणे हे समाजातील तिच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवते आणि क्रूरता आहे असे खंडपीठाने म्हटले आहे.
उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात नमूद केले की, महिलेने तिच्या स्वत:च्या विधानाव्यतिरिक्त इतर आरोपांच्या समर्थनार्थ विश्वासार्ह पुरावे सादर केले नाहीत. याचिकाकर्त्या महिलेने पतीवर खोटे आणि बदनामीकारक आरोप करून मानसिक छळ केल्याचे मृताच्या वकिलाने न्यायालयाला सांगितले.
उच्च न्यायालयाने पतीने कौटुंबिक न्यायालयासमोर दिलेल्या विधानाचा संदर्भ दिला. ज्यामध्ये पत्नीने त्याला आपल्या मुलांपासून आणि नातवंडांपासून वेगळे केले असल्याचा दावा केला होता. या प्रकरणात याचिकाकर्त्या पत्नीने जे आरोप केलेत, ते बेछुट, तथ्यहिन आहेत. या आरोपांमुळे पतीची समाजात अप्रतिष्ठा झाली आहे. त्यामुळे पत्नीची वर्तणूक हिंदू विवाह कायदा कलमानुसार क्रुरता ठरते, असे न्यायमूर्तींनी म्हटले आहे.
Edited By - Satish Daud