मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या अडचणीत २०१६ मधील मारहाण प्रकरणामुळे वाढ
सत्र न्यायालयाने तावडे यांच्यासह अन्य दोन आरोपींविरोधात आरोप निश्चित केले
२९ जुलै २०१६ रोजी वाकोला येथील शाळेत ही घटना घडल्याचा आरोप आहे.
मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. २०१६ मध्ये मुंबईतील शास्त्रीनगर महापालिका शाळेत झालेल्या मारहाणीच्या प्रकरणात सत्र न्यायालयाने रितू तावडे यांच्यासह अन्य दोन आरोपींविरोधात आरोप निश्चित केले आहेत. सोमवारी न्यायालयात ही प्रक्रिया पार पडली. यावेळी न्यायालयाच्या आदेशानुसार तावडे सुनावणीसाठी प्रत्यक्ष उपस्थित होत्या.
न्यायालयात रितू तावडे आणि अन्य आरोपींनी त्यांच्यावरील आरोप फेटाळले आहेत. तसेच आपण निर्दोष असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणाच्या सुनावणीला उपस्थित राहण्याचे निर्देश न्यायालयाने यापूर्वीच दिले होते. ऑक्टोबर महिन्यात झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने गैरहजर राहिल्यास अटक वॉरंट काढण्याचा आणि जामीन रद्द करण्याचा इशाराही दिला होता.
ही घटना २९ जुलै २०१६ रोजी सांताक्रूझ पूर्वेकडील वाकोला परिसरातील शास्त्रीनगर येथील उर्दू माध्यमाच्या महापालिका शाळेत घडल्याचा आरोप आहे. या शाळेतील शिक्षिका शाहीन खान यांची बीकेसी येथील दुसऱ्या शाळेत बदली करण्यात आली होती. शाहीन खान यांना कर्करोग असतानाही त्यांची बदली केल्याने शाळेतील मुख्याध्यापिका आणि इतर शिक्षकांमध्ये नाराजी होती. याच कारणावरून वाद झाल्याचा दावा केला आहे. या वादाचे रूपांतर मारहाणीत झाल्याचा आरोप आहे. मोहम्मद याकूब रहीद आणि नदीम अहमद शेख या दोन पुरुष शिक्षकांना कानाखाली मारण्यात आल्याचे एफआयआरमध्ये नमूद आहे.
या प्रकरणात रितू तावडे यांच्यासह सात जणांवर आरोप करण्यात आले आहेत. याप्रकरणी ऑगस्ट २०१६ मध्ये वाकोला पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम ३५३, ३३२ आणि १४९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, १२ मार्च रोजी न्यायालयाने तावडे यांची आरोपमुक्त करण्याची याचिका फेटाळली होती. दोन्ही पीडित शिक्षकांनी मारहाण करणाऱ्यांमध्ये तावडे यांचे नाव स्पष्टपणे घेतले असून, इतर साक्षीदारांनीही त्यांच्या विरोधात जबाब दिल्याचे न्यायालयाने नमूद केले होते. आता न्यायालयात आरोप निश्चित झाल्याने या प्रकरणाच्या पुढील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.