BMC Mayor election hotel politics by Eknath Shinde : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत कुणालाही स्पष्ट बहुमत मिळाले नाही. भाजप अन् ठाकरेंची शिवसेना बहुमतापासून दूर राहिली आहे. सत्तेत येण्यासाठी कुबड्यांचा आधार घ्यावाच लागणार आहे. त्यातच शिंदेंच्या शिवसेनेकडून २९ नगरसेवकांना फाईव्ह स्टार हॉटलमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यातच ठाकरेंच्या शिवसेनेकडूनही हालचाली सुरू झाल्या आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा झाल्याचे राऊतांनी सांगितले.
मुंबई महानगरपालिकेच्या महापौर निवडीवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. "एकनाथ शिंदे यांचा पक्ष म्हणजे भाजपचे अंगवस्त्र आहे आणि त्यांचे प्रमुख अमित शहा आहेत," अशा शब्दांत राऊत यांनी शिंदेंना लक्ष्य केले.
शिंदेंनी आपल्या नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवल्याच्या मुद्द्यावर राऊत यांनी उपरोधिक टीका केली. ते म्हणाले, एकनाथ शिंदे स्वतः उपमुख्यमंत्री आहेत, तरीही त्यांना आपले नगरसेवक पळवले जातील अशी भीती वाटते, ही मोठी 'हास्यजत्रा' आहे. त्यांनी आमदारांना सुरतला नेले होते, आता नगरसेवकांना कोंडून ठेवले आहे. २९ नगरसेवकांना कोंडणे हा मराठी अस्मितेचा कोंडमारा आहे.
जर महायुतीचाच महापौर बसणार असेल, तर नगरसेवक कोंडून का ठेवले? याचे उत्तर 'देवाभाऊ' (देवेंद्र फडणवीस) यांनी द्यावे, असाही टोला त्यांनी लगावला.
महापौर निवडीबाबत बोलताना राऊत यांनी सूचक विधान केले. "देवाची इच्छा असेल तर शिवसेनेचाच महापौर बसू शकतो. पडद्यामागे बऱ्याच गोष्टी घडत आहेत. बहुमत कितीही असले तरी ते चंचल असते, हे ऐतिहासिक सत्य आहे. भाजपचा महापौर होऊ द्यायचा नाही, हे सर्वांनी ठरवले आहे," असे त्यांनी स्पष्ट केले. बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षात महापौर शिवसेनेचाच असायला हवा, पण शिंदेंनी मुंबई भाजपच्या दावणीला बांधली आहे. काँग्रेसमुळे मतविभाजन झाले असले तरी आगामी लढाईत काँग्रेस आमच्यासोबतच असेल, असा विश्वास राऊतांनी व्यक्त केला.
आम्ही ताज लँड्स एंडला जेवायला जाणार आहोत. आमच्यावर उगाच संशय घेऊ नका. कालच जाणार होतो, पण तिथे पाहिलं तर यांनी 'येरवडा जेल' करून ठेवलंय. आम्ही फक्त जेवणासाठी जात आहोत," असा चिमटा त्यांनी काढला. "शिवसेनेचा महापौर हा मूळ शिवसेनेचाच असतो, 'ड्युप्लिकेट' शिवसेनेचा नाही," असे म्हणत त्यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.