शिवसेना ठाकरे ग्रुप आणि मनसे युतीमुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी
एबी फॉर्म न मिळाल्याने इच्छुक उमेदवार नाराज
वरळी मतदारसंघात बंडखोरीचे सूर
पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्याच्या दिल्या धमक्या
आदित्य ठाकरे यांची डोकेदुखी वाढली
मुंबई महानगर पालिका शिवसेना ठाकरे गट आणि मनसे एकत्र लढत आहेत. जागा वाटपावरून दोन्ही पक्षांमधील इच्छुक उमेदवारांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. एबी फॉर्म मिळावा यासाठी दोन्ही पक्षांकडे इच्छुकांनी रांगा लावल्या आहेत. पण उमेदवारी अर्ज मिळत नसल्याने अनेक जण नाराज आहेत. अशातच मुंबईतील वरळी विधानसभा मतदारसंघात आदित्य ठाकरे यांच्यासाठी पक्षांतर्गत नाराजी आणि बंडखोरीच्या सुरांमुळे मोठी डोकेदुखी निर्माण झाली आहे. उमेदवारी वाटपावरून शिवसेना ठाकरे गटामधील पदाधिकारी नाराज असून काही ठिकाणी थेट राजीनाम्यापर्यंत परिस्थिती पोहोचली आहे. अनेक पदाधिकाऱ्यांनी बंडखोरी करण्याच्या धमक्या देखील दिल्या आहेत.
वॉर्ड क्रमांक १९६ महिला खुला झाल्यानंतर विभागप्रमुख आशिष चेंबूरकर यांच्या जागी त्यांच्या पत्नी पद्मजा चेंबूरकर यांना उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. मात्र पद्मजा चेंबूरकर या राजकारणात सक्रिय नसतानाही नातेवाईक असल्यामुळे उमेदवारी दिल्याचा आरोप कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. या वॉर्डसाठी पक्षातील निष्ठावंत पदाधिकारी आकर्शिका बेकल पाटील आणि संगीता जगताप यांच्या नावांची जोरदार चर्चा होती.
आकर्शिका पाटील या युवासेना विभाग अधिकारी असून आदित्य ठाकरेंच्या निवडणुकीत वरळीतील हाय-राईज इमारतींमधील उच्चभ्रू मतदारांची जबाबदारी त्यांच्याकडे होती. तर संगीता जगताप या महिला शाखाप्रमुख म्हणून सक्रिय आहेत. मात्र नेत्यांच्या नातेवाईकांना प्राधान्य दिल्याने निष्ठावंतांवर अन्याय झाल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्यामुळे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे.
वॉर्ड क्रमांक १९३ मध्येही असाच असंतोष दिसून आला आहे. वरळी कोळीवाड्यातील शाखाप्रमुख सूर्यकांत कोळी यांनी हरीश वरळीकर आणि आशिष चेंबूरकर यांच्याविरोधात पत्र लिहून पदाचा राजीनामा दिला आहे. १९३ वॉर्डमधून सूर्यकांत कोळी इच्छुक होते मात्र या वॉर्डसाठी माजी नगरसेविका हेमांगी वरळीकर यांना उमेदवारी देण्यात आल्याने नाराजी वाढली आहे. तर, वॉर्ड क्रमांक १९७ मनसेला देण्यात आल्याने ठाकरेंच्या शिवसेनेतील पदाधिकारी संतप्त झाले आहेत. या निर्णयाविरोधात पदाधिकाऱ्यांनी पदाचा राजीनामा देण्याची धमकी दिली आहे.
'आम्ही मनसेच्या उमेदवाराचे काम करणार नाही.', असा थेट इशाराही देण्यात आला आहे. १९७ वॉर्डमधील नाराजी दूर करण्यासाठी ठाकरेंचा उमेदवार मनसेच्या चिन्हावर लढवावा, अशी विनंती ठाकरेंच्या शिवसेनेकडून मनसेला करण्यात आल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. एकीकडे विरोधकांशी लढा आणि दुसरीकडे स्वपक्षातील असंतोष या दुहेरी आव्हानामुळे आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघातील राजकीय गणित अधिकच गुंतागुंतीचे होत असल्याचं चित्र दिसून येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.