कल्याण पूर्वेचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर शुक्रवारी (२ फेब्रुवारी) मध्यरात्री गोळीबार केला होता. सत्ताधारी गटाच्या आमदाराने पोलीस ठाण्यातच गोळीबार केल्यामुळे संपूर्ण राज्य हादरलं असतानाच, पोलीस ठाण्यात झालेल्या या गोळीबाराच्या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.
महेश गायकवाड पोलीस ठाण्यात खुर्चीवर बसलेले असतानाच त्यांच्यावर गणपत गायकवाड यांनी अचानक गोळीबार केला. त्यामुळं एकच खळबळ उडाली. महेश गायकवाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत त्यांना गोळ्या लागल्या होत्या. यात महेश गायकवाड गंभीर जखमी होऊन खाली पडले. खाली पडल्यानंतरही त्यांच्यावर गोळीबार आणि मारहाण करण्यात आली आहे.
मुंबईच्या उल्हासनगर येथील पोलीस ठाण्यात पोलिसांच्या डोळ्यादेखत ही खळबळजनक घटना घडली आहे. आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटातील शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर ५ गोळ्या झाडल्या आहेत. गोळीबार सुरू असताना पोलीस मदतीसाठी धावून आले आणि गणपत गायकवाड यांच्या तावडीतून महेश गायकवाड यांना सोडवून घेतलं. या घटनेत महेश गायकवाड गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असून ते व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती आहे. त्यांचे सहकारी राहुल पाटील यांनाही गोळ्या लागल्याची माहिती आहे.
(साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
गोळीबाराची माहिती मिळताच भाजपसह शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयासमोरच मोठी गर्दी केली होती. दुसरीकडे सत्ताधारी पक्षातील आमदाराची गोळीबार करण्यापर्यंत मजल जातेच कशी? असा संतप्त सवाल नागरिक आणि विरोधी पक्षांकडून उपस्थित केला जात आहे. कल्याण पूर्वेत शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड आणि भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यात नेहमीच वादावादी तसेच आरोप प्रत्यारोप होत होते. वरिष्ठांनी मध्यस्थी केल्यानंतर देखील दोघांमधील धूसफूस कायम होती. दरम्यान शुक्रवारी मध्यरात्री सुमारास दोन्ही नेते पुन्हा आमने-सामने आले आणि हा थरार संपूर्ण महाराष्टाने पाहिला.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.