अभिजीत देशमुख, साम टीव्ही प्रतिनिधी
कल्याण : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीतील पक्षांनी चाचपणी सुरु केली आहे. खासदार नारायण राणे यांनी भाजपने थेट राज्यातील विधानसभेच्या २८८ जागांवर लढलं पाहिजे, असं म्हटलं आहे. याचदरम्यान, ठाणे, कल्याणमध्ये खासदार असलेल्या शिंदे गटानेही लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघाची चाचपणी सुरु केली आहे. दुसरीकडे भाजपने कल्याण लोकसभा मतदारसंघातील पाच विधानसभा मतदारसंघांवर दावा केला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कल्याण-डोंबिवलीत महायुतीमधील भाजप-शिवसेना शिंदे गटासमोर पेच उभा राहिला आहे. भाजपने कल्याण पूर्व ,कल्याण पश्चिम ,डोंबिवली,कल्याण ग्रामीण ,अंबरनाथ मतदारसंघावर दावा केला आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघातील पाच विधानसभा मतदारसंघावर भाजप दावा करणार असल्यााची माहिती खुद्द भाजप जिल्हाध्यक्षांनी दिली आहे.
'कल्याणमधील पाचही विधानसभा मतदारसंघात आमची तयारी सुरू आहे. महायुतीचा उमेदवार म्हणून जो निर्णय वरिष्ठ घेतील, त्याप्रमाणे उमेदवार निवडून आणू,बंडखोरी होणार नाही. कल्याण पूर्वेत भाजपचा उमेदवार पाहिजे, अशी आमची मागणी असून त्याबाबत वरिष्ठ निर्णय घेतील, अशी माहिती भाजप जिल्हा अध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांनी दिली.
दरम्यान, जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांनी पुढे म्हटलं की, 'कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम, कल्याण ग्रामीण, डोंबिवली आणि अंबरनाथ या विधानसभा मतदारसंघाकरीता तयारी सुरु आहे. आम्ही या मतदारसंघावर दावा करणार आहोत. भाजपचा उमेदवार असेल तर शंभर टक्के निवडून येणार. मित्र पक्षाचा उमेदवार आला तरी आम्ही मदत करणार. मात्र या पाचही विधानसभा मतदारसंघावर आमचा दावा आहे. वरिष्ठ पातळीवर काय निर्णय होतो, त्यावर अवलंबून आहे. वरिष्ठ जो निर्णय घेतील तो सगळ्यांना मान्य करावा लागेल'.
दरम्यान, कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजप-शिंदे गट वाद पेटण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात भाजप आमदाराच्या विरोधात शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी बॅनरबाजी सुरु केली आहे. शिंदे गटाचे उपशहर प्रमुख विशाल पावशे यांनी बॅनर लावले आहेत. या बॅनरवर काय हवंय ? नवीन पर्व की जुनाच कल्याण पूर्व, असा आशय लिहिला आहे. गणपत गायकवाड हे कल्याण पूर्वेचे भाजप आमदार आहेत. या बॅनरनंतर या विधानसभा मतदारसंघात भाजप आणि शिंदे गटातील मतभेद आणखी वाढण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.