मुंबईत भोंदूबाबाचा भूत उतरवण्याचा बनाव उघड
६० हून अधिक नागरिकांची पोलिसांकडे तक्रार
जादूटोणा आणि चमत्काराच्या नावाखाली फसवणूक
राज्यात अजून एका भोंदूबाबानं लोकांना गंडवलंय आणि हा प्रकार कोणत्या गावखेड्यात नव्हे तर चक्क मुंबईकरांना या भोंदूनं गंडा घातलाय. पाहूयात महाराष्ट्रात उच्छाद मांडलेल्या या भोंदूबाबांवरचा हा विशेष रिपोर्ट...
अंगात देवी येतेय....होय येतेय... अहो खरचं येतेय... असं आम्ही नाही तर हा भोंदूबाबा रिदम पांचाळ म्हणतोय... मालाड पूर्वमधील या भोंदू रिदम पांचाळचा हा रिदम पुन्हा एकदा ऐका... ही डांगडिग आहे. लोकांच्या शरीरातील भूत उतरवण्यासाठी. हे ऐका हा भोंदू भूत उतरवायला थेट देवीलाच हाका मारतोय. ते ही त्याच्या भक्तांच्या गराड्यात. मात्र हा रिदम पांचाळ फुलटाईम बुवाबाजी करत नाही बरं का? हा जीम ट्रेनर सुद्धा आहे. त्याच्या या जादूटोण्यानं हैराण झालेल्या स्थानिक नागरिकांनी अखेर दिंडोशी पोलीस स्टेशनमध्ये त्याच्याविरोधात तक्रार दाखल केलीय.
रविवार-गुरुवारी देवी येते असं म्हणत भोंदू रिदम पांचाळ लोकांना फसवून भूत उतरवण्याचा दिखावा करायचा. पुजेसाठी बकऱ्याचं काळीज, काळं आणि लाल कापड, स्मशानातील राख वापरायचा. भक्तांना पूजेनंतर चौकात लिंबू, टाचणी, दारुची बाटली, कुंकू, सिगारेट ठेवायला लावायचा. निपुत्रिक महिलांना मूल होण्याचेही आश्वासन देऊन सर्व आजार बरे करण्याचे दावेही करायचा.अखेरीस परिसरातील 60 हून अधिक लोकांनी मिळून भोंदूबाबाविरोधात सामुहिक तक्रार दाखल केली.
पण हा काही एकच प्रकार नाही. पुण्याच्या खेड तालुक्यात तर भोंदूगिरीने हद्दच पार केली. 'चेडा' आणि 'करणी'ची भीती दाखवून एका हसत्याखेळत्या कुटुंबात फूट पाडण्याचे काम किसन तळपे आणि मंगेश कारोटे नावाच्या भोंदू भगतांनी केलीय. दुसरीकडे संगमनेरच्या वडगावपानमधील एका बाबाला पाहून तर मेडीकल सायन्सवरचा विश्वासच उडेल अशी परिस्थिती आहे. 'गडगे महाराज' म्हणवून घेणारा भोंदू मंत्रोच्चाराने कॅन्सर, पॅरेलिसिस बरे करण्याचा दावा करतोय. याप्रकरणी अनिसनं नागरिकांची आर्थिक लूट करणाऱ्या या भोंदूवर कारवाई करण्याची मागणी केलीय.
एकीकडे विज्ञानाच्या जोरावर माणूस चंद्रावर, मंगळावर पोहचलाय. तरीही महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात आजही भोंदूबाबाच्या दुकानदारीला अंधश्रद्धाळु पोसतायत. जादूटोणा विरोधी कायदा असूनही, अंमलबजावणीतील ढिलाई आणि लोकांची अगतिकता अंधश्रद्धेला खतपाणी घालतेय. प्रत्येकास येथे हवा, कोणीतरी जबरी बुवा, जो काढील साऱ्या उवा, मनातल्या चिंतांच्या ही पाडगावकरांनी कवितेतून मांडलेली महाराष्ट्रातील भोंदूगिरीची परिस्थिती आजही तशीच आहे. त्यामुळे अंधश्रद्धेला जितके भोंदूबाबा जबाबदार आहेत, तितकेच अंधश्रद्धाळु भक्तही जबाबदार आहे. मात्र मालाडमधील प्रकरणात स्थानिकांनी तक्रार दाखल करण्याची केलेली हिंमत इतर नागरिकांकडून होणार का? प्रशासन यासंदर्भात कठोर पावले कधी उचलणार? हा खरा प्रश्न आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.