संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही
कल्याण आधारवाडी जेल येथे कार्यरत असलेल्या दोन जेल कर्मचाऱ्यांना लाच घेताना अँटी करप्शन विभागाने रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे कारागृह प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. शरद पानपाटील आणि सतीश भोसले अशी अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. कारागृहात बंद असलेल्या एका कैद्याची भेट घडवून आणण्यासाठी संबंधित कैद्याच्या नातेवाईकांकडे दीड हजाराची रुपयांची लाच मागितल्याचा आरोप केला आहे.
नातेवाईकांनी याबाबत अँटी करप्शन विभागाकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर अँटी करप्शनच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला. ठरल्याप्रमाणे दीड हजाराची लाच स्वीकारताना दोन्ही कर्मचाऱ्यांना रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणी महाराष्ट्र अँटी करप्शन ब्युरो यांनी कारवाई केली असून दोन्ही आरोपींविरुद्ध खडकपाडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असून या घटनेमुळे कारागृह प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
दरम्यान कल्याण पूर्व परिसरातील दोन सख्या बहिणी बेपत्ता झाल्याच्या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. सुरुवातीला या दोघींना एका मुस्लिम तरुणाने बेपत्ता केल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच हे प्रकरण लव्ह जिहादशी संबंधित असल्याची चर्चा रंगली होती. त्यामुळे यात सामाजिक कार्यकर्ते यांनी सुद्धा उडी घेतली होती,मात्र पोलिस तपासानंतर वेगळीच बाब समोर आली आहे. बेपत्ता झालेल्या दोन्ही बहिणींना पोलिसांनी शोधून काढले असून त्या आपल्या मित्रांच्या घरी सुरक्षित असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्यांची सविस्तर चौकशी केली असता, दोघींनीही धक्कादायक खुलासा केला.
सावत्र आई आणि वडील सातत्याने मारहाण करतात तसेच शिक्षण घेऊ देत नाहीत, असा आरोप दोन्ही मुलींनी केला आहे. घरातील सततच्या त्रासाला कंटाळून आम्ही स्वतःहून घर सोडले, असे त्यांनी स्पष्टपणे पोलिसांना सांगितले. या प्रकरणात लव्ह जिहाद असा कोणताही प्रकार नसल्याचेही त्यांनी ठामपणे सांगितले आहे.
तसेच आम्हाला आमच्या आई-वडिलांसोबत राहायचे नाही, असा निर्णयही दोघींनी पोलिसांसमोर व्यक्त केला आहे. मुलींच्या या भूमिकेमुळे प्रकरणाला वेगळे वळण मिळाले असून, पोलिसांकडून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, सुरुवातीला लावण्यात आलेले आरोप निराधार ठरत असल्याचे चित्र स्पष्ट होत असून, या घटनेमुळे समाजात अफवा पसरवण्याबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिस प्रशासनाने नागरिकांनी कोणतीही अप्रमाणित माहिती पसरवू नये, असे आवाहन केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.