Anil Deshmukh News : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सीबीआय प्रकरणातील जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयात ही सुनावणी होणार असून अनिल देशमुख यांना आज बेल मिळणार की पुन्हा त्यांची जेलवारी वाढणार याकडेच सर्वांचं लक्ष लागून आहे. ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यांमध्ये देशमुख यांना याधीच जामीन मिळालेला आहे. मात्र, सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यांत मुंबई सत्र न्यायालयाने देशमुख यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. (Latest Marathi News )
मुंबई सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. याबाबत सुनावणी पूर्ण झाली असून दोन्ही बाजूंकडील युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांनी निर्णय राखून ठेवला होता. दरम्यान, आज मुंबई हायकोर्ट (Mumbai High Court) देशमुखांच्या जामीन अर्जावर काय निकाल देतं याकडे सर्वांच्याच नजरा लागून आहे. सीबीआयच्या गुह्यातही जामीन मिळाल्यास देशमुख हे तुरुंगाबाहेर येऊ शकणार आहेत.
कथित 100 कोटींच्या खंडणी वसुली प्रकरणात देशमुख सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. या प्रकरणात विशेष सीबीआय न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांनी त्यांच्या प्रकृतीचा विचार करीत जामीन अर्जावर प्राधान्याने सुनावणी घेतली.
बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेला हॉटेल-रेस्तराँ मालकांकडून खंडणी वसूल करण्यासाठी देशमुख यांनी सांगितले नव्हतेच. साक्षीदारांच्या जबाबावरून हे स्पष्ट होते, असा युक्तिवाद देशमुख यांचे वकील विक्रम चौधरी यांनी केला होता. त्यावर सीबीआयतर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी आक्षेप घेतला आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भूजबळ यांनी देशमुखांच्या जामीनावरून भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. भाजपने पार कुटुंब उद्धवस्त केले, अनिल देशमुख, नवाब मलिक असतील प्रचंड आजारी आहेत. अनिल देशमुखांची ईडीची केस गेली तरी त्यांना जामीन मिळत नाही, अशी खंत भुजबळांनी व्यक्त केली आहे.
शायरीतून खंत व्यक्त माजी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, आमच्यावर तर किती वार झाले आयुष्यभर वार सुरूच आहे, असे म्हणताना हिसाब किताब हमसे ना पूछ अब, ऐ ज़िन्दगी तूने सितम नहीं गिने, तो हमने भी ज़ख्म नहीं गिने अशी शायरीही छगन भुजबळ यांनी यावेळी म्हटली आहे. केवळ जामीन मिळत नाही म्हणून ईडी लावली जाते, आणि लोकांना अटकून ठेवले जाते, असे भुजबळांनी म्हटले आहे.
Edited By - Satish Daud
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.