आज अंगणवाडी सेविकांना खुद्द संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेचे अध्यक्ष डेनिस फ्रान्सिस यांच्या हस्ते स्मार्ट फोन मिळाला. वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची डेनिस फ्रान्सिस आणि संयुक्त राष्ट्र प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाबरोबर बैठक सुरु होती. या बैठकीनंतर राज्यातल्या अंगणवाडी सेविकांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्मार्ट फोन वितरण कार्यक्रम होता, ज्यासाठी अंगणवाडी सेविका आणि संबंधित अधिकारी वर्षा येथे येऊन थांबले होते.
मुख्यमंत्र्यांनी महिला सक्षमीकरणाबाबत संयुक्त राष्ट्र शिष्टमंडळाला माहिती देतांना, अध्यक्ष डेनिस फ्रान्सिस यांना विनंती करून त्यांच्या हस्ते अंगणवाडी सेविकांना स्मार्ट फोन्सचे वितरण झाले तर एक बहुमान असेल असे सांगितले. डेनिस फ्रान्सिस यांनी मुख्यमंत्र्यांची विनंती लगेच मान्य केली आणि अंगणवाडी सेविकांना लागलीच समिती कक्षात बोलावून घेऊन मोबाईलचे वाटप करण्यात आले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
संयुक्त राष्ट्रसारख्या सर्वोच्च जागतिक संस्थेच्या अध्यक्षांच्या हस्ते हा स्मार्टफोन मिळाल्यावर या सेविकांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला तसेच आनंदही झाला. डेनिस फ्रान्सिस यांनी देखील उत्सुकतेने या उपक्रमाची माहिती मुख्यमंत्र्यांकडून घेतली तसेच कार्यक्रमानंतर या सेविकांच्या विनंतीचा स्वीकार करून एकत्रित छायाचित्र देखील काढून घेतले. मुख्यमंत्र्यांनी समयसूचकता दाखवल्याबद्धल अंगणवाडी सेविकांनी आणि महिला व बाल कल्याण अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना धन्यवाद दिले. (Latest Marathi News)
यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात मनस्वी मोहन काते, कविता बाबु व्हटकर, संगिता कुकरेती, शीतल लोखंडे, प्रेमा घाटगे, रजनी घाडगे,सुजाता जावळे, सीमा शिंदे यांना स्मार्ट फोन्स देण्यात आले.
१ लाख १४ हजार ९७४ स्मार्ट फोन देणार
पोषण अभियानात राज्य शासनामार्फत अंगणवाडी सेविकांना स्मार्ट मोबाईल फोन दिले जात आहेत. 2023-24 मध्ये 110486 अंगणवाडी सेविका, 3899 मुख्यसेविका/पर्यवेक्षिका, 589 तांत्रिक कर्मचारी यांच्यासाठी एकूण 1 लाख 14 हजार 974 स्मार्ट फोन उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. Take Home Ration Software & Migration Tracking Software तसेच राज्य सरकार मार्फत सुरू करण्यात येणारे नावीन्यपूर्ण उपक्रम स्मार्ट फोनद्वारे लागू करता येतील. पोषण ट्रॅकर अॅप्लीकेशनद्वारे एकात्मिक बाल विकास सेवा योजनेची अंमलबजावणी स्मार्ट मोबाईल फोनद्वारे रियल- टाईम मॉनिटरींग पद्धतीने करण्यात येणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.