Pune News 2024 
मुंबई/पुणे

Pune News : कुख्यात गुंडांची हत्या, पोर्श अपघात, पूजा खेडकर; २०२४ मध्ये विद्येचं माहेरघर या घटनांनी हादरलं!

pune year end review 2024 : खुनाचा प्रयत्न, कोयत्याने वार, सार्वजनिक ठिकाणी शस्त्रांद्वारे दहशत पसरवणे, महिलांची छेडछाड, खुलेआम ड्रग्सची विक्री असे अनेक प्रकार सरत्या वर्षात पुणेकरांनी अनुभवले.

Namdeo Kumbhar

अक्षय बडवे, प्रतिनिधी, साम टीव्ही

पुणे, ऑक्सफर्ड ऑफ द इस्ट किंवा सांस्कृतिक राजधानी अशी या शहराची ओळख. मात्र २०२४ मध्ये मेट्रो सिटी म्हणून मानल्या जाणाऱ्या शहरात अशा घटना घडल्या की गुन्हेगारीचे हब तर पुणे होत नाहीय ना असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थितीत झाला.

पुणे शहरात झालेले खून, खुनाचा प्रयत्न, कोयत्याने वार, सार्वजनिक ठिकाणी शस्त्रांद्वारे दहशत पसरवणे, महिलांची छेडछाड, खुलेआम ड्रग्सची विक्री असे अनेक प्रकार सरत्या वर्षात पुणेकरांनी अनुभवले. इतकंच नाही तर अशा अनेक घटना सुद्धा अधोरखित झाल्या की जिथे पुणे पोलिसांनी जिवाचं रान करून आरोपींच्या वेळीच मुसक्या आवळल्या तर कधी रेकॉर्ड वरील गुन्हेगारांची परेड काढली गेली. पुण्यातील पोर्श अपघातासह अशा अनेक घटना घडल्या ज्याने संपूर्ण शहर हादरून गेलं. सरत्या वर्षातील कुठल्या अशा घटना घडल्या तुम्हीच पाहा..

शरद मोहोळ हत्या प्रकरण

२०२४ ची सुरुवातच पुण्यातील या खळबळजनक घटनेने घडली. एकेकाळी कुख्यात गुंड मानला जाणाऱ्या शरद मोहोळ यांची त्यांच्याच घराबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. आर्थिक वाद आणि जमिनीच्या वादातून झालेल्या हत्येने २०२४ हे वर्ष गुन्हेगारीचे असणार की काय याची चाहूल लागली होती. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अवघ्या आठ तासात आरोपींच्या मुसक्या आवळल्या मात्र शरद मोहोळच्या लग्नाचा वाढदिवशी त्याच्या आयुष्याची दोरी कापली गेली आणि पुण्यातील गँग वॉर आता डोकं वर काढणार अशी भीती संपूर्ण शहराला बसली

पुणे पोलिसांनी काढली २६७ गुन्हेगारांची परेड

फेब्रुवारी महिन्यात पुणे पोलीस आयुक्त पदाचा अमितेश कुमार यांनी नुकताच कार्यभार स्वीकारला आणि पहिला दणका दिला. पुण्यातील गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी थेट पोलीस आयुक्त ॲक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळालं. पुणे का बॉस? ओन्ली पोलीस असं छाती ठोकपणे जेव्हा पुणेकर म्हणाले तो दिवस म्हणजे जेव्हा पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने १०,२० नव्हे तर तब्बल २६७ गुन्हेगारांची एकत्रित परेड काढली. फोफावलेल्या गुंडगिरीला चाप लावण्यासाठी पुणे पोलिसांनी त्यांची परेड काढण्याची नामी शक्कल लढवली.

रेकॉर्ड ब्रेक! पुणे पोलिसांनी जप्त केलं ४००० कोटींचे ड्रग्स

पुण्यातील विश्रांतवाडी भागात मिठाच्या पुड्यात सापडलेले २ किलो ड्रग्स थेट एका अंतराष्ट्रीय ड्रग्स तस्कर आणि त्याच्या रॅकेट पर्यंत पोहचलं. राज्यसभरातील विविध ठिकाणी छापेमारी करीत पुणे पोलिसांकडून ४००० कोटी रुपये किमतीचे ड्रग्ज जप्त केलं. या संपूर्ण ड्रग्स तस्करीचा मास्टरमाईंड भारतात जन्मलेला मात्र परदेशात स्थायीत असलेला संदीप धूनिया हे स्पष्ट झालं. पुणे जिल्ह्यातील कुरकुंभ येथे तयार झालेले ड्रग्स हा धूनिया फूड पॅकेट मधून लंडन आणि इतर ठिकाणी तस्करी करायचा. केंद्रीय यंत्रणांनी इंटरपोल ची मदत घेत धूनियावर रेड कॉर्नर नोटीस बजावली आहे.

पोर्शे अपघात, पुण्यातील गल्लीपासून ते जागतिक नकाशावर पोहचलेली दुर्दैवी घटना

१८ मे २०२४, फक्त पुणे शहर च नव्हे तर देश, विदेशात ही तारीख ओळखली जाईल ती म्हणजे पोर्शे अपघातामुळे. पुण्यातील कल्याणीनगर भागात एका अल्पवयीन तरुणाने त्याच्याजवळलील भरधाव पोर्शे गाडी ने २ तरुणांचा जीव घेतला. पोलिसांनी अल्पवयीन मुलाला अटक केली पण बाल न्यायलयाने या अल्पवयीन मुलाला ३०० शब्दांच्या निबंध लिहिण्याच्या अटी वर त्याची सुटका केली. आणि संपूर्ण देश पेटून उठला. यातील अनेक कंगोरे जसे जसे बाहेर आले तशी ही घटना गंभीर होत गेली. स्थानिक आमदाराचा पोलिसांवर दबाव, आरोपींचे रक्ताचे नमुने बदलणे, ससून रुग्णालयातील डॉक्टर यांनी आरोपींना केलेली मदत यामुळे या घटनेकडे एक चिड येणारी घटना म्हणून पाहायला गेलं. या प्रकरणात पैश्याचा जोरावर सगळं जिंकता येईल असं मानणारे अनेक जण आज ही येरवडा कारागृहात आहेत.

माजी नगरसेवक वनराज आंदेकर हत्या प्रकरण

१ सप्टेंबर रोजी पुण्यातील नाना पेठेत डोके तालीम परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा धारधार शस्त्राने वार करत आणि गोळीबार करत खून करण्यात आला. सुरुवातीला वनराज याचा खून कौटुंबिक कारणांनी आणि संपत्तीच्या वादातून झाला असं समजलं मात्र वर्चस्व वादातून हा सगळा प्रकार घडल्याचे पोलीस तपासातून समोर आलं. या घटनेने पुणे शहरात टोळी युद्ध पुन्हा जोर धरणार अशी चर्चा शहरातील प्रत्येक चौका चौकात ऐकायला मिळाली.

हद्द पार! पोलीस अधिकाऱ्यावर कोयत्याने हल्ला

ऑगस्ट महिन्यात पुणे पोलीस दलातील कर्तव्यावर असलेल्या एका सहायक पोलीस निरीक्षकावर कोयत्याने हल्ला करण्यात आला. आरोपींनी थेट डोक्यातच वार केल्याने अधिकारी गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणातील आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पुणे पोलिसांना अवघ्या एका दिवसात यश आले. पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्था याबद्दल चर्चा सुरू असतानाच पोलीस अधिकाऱ्यावर च झालेल्या हल्ल्यामुळे संतापाची लाट आणखी तीव्र झालेली पाहायला मिळाली.

शिर वेगळं धड वेगळं, पुण्यातील तो रहस्यमय मृतदेह

पुण्यातील चंदननगर भागातून वाहणाऱ्या मुठा नदीत एक मृतदेह आढळून आला. या मृतदेहाचे अक्षरशः तुकडे केले होते. ओळख पटू नये म्हणून या मृतदेहाचे शिर, धड वेगळं करून नदीत फेकलं होतं. पावसाळ्याच्या दिवसात नदीचा पाण्याचा वेग आणि व्याप्ती याचा फायदा घेत भावानेच अवघ्या १० बाय १० च्या रूम वरून स्वतःच्या सख्ख्या बहिणीचा निर्घृण खून केला. तांत्रिक विश्लेषण आणि ह्युमन intelligence या दोन गोष्टींच्या जोरावर पुणे पोलिसांनी या घटनेचा तपास अतिशय शिताफीने केला.

पूजा खेडकर, नावातच खूप काही दडलंय

महाराष्ट्र संवर्ग प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर सध्या युपीएससीकोटाच्या बनावट कागदपत्रांमुळे चर्चेत आल्या. वरिष्ठांच्या केबिनवर ताबा मिळवणं, खाजगी गाडीवर दिवा लावणे, कोट्यवधी रुपयांची मालमत्ता असून ओबीसी कोट्यातून यूपीएससी परीक्षा पास उत्तीर्ण होणं, दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे आयएएसपद मिळवणं, असे गंभीर आरोप ठेवत पूजा खेडकर यांचं आय ए एस पद केंद्रीय लोकसेवा आयोगाने रद्द केलं. या महिलेने पूजा खेडकर हे नाव पण चुकीच्या पद्धतीने वापरून अनेक वेळा परीक्षा दिल्या आणि उत्तीर्ण झाली. या घटनेने एक आय एस अधिकारी सुद्धा असा असू शकतो का या प्रश्नाने अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. सध्या या प्रकरणाचा तपास दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलकडून सुरू आहे.

बोपदेव घाट सामूहिक अत्याचार प्रकरणाने राज्य हादरलं

ऑक्टोबर महिन्यात पुण्याच्या जवळ असलेल्या बोपदेव घाटामध्ये मित्रासोबत फिरण्यासाठी गेलेल्या एका २१ वर्षीय तरूणीवर सामूहिक अत्याचार केल्याच्या घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. या घटनेमुळे पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं तर दुसऱ्या बाजूला सामान्य नागरिकांमध्ये या घटनेमुळे भीती पसरली हे ही तितकंच खरं. विरोधकांनी तर राज्याचे गृहमंत्री यांच्या राजीनाम्यासाठी अनेक आंदोलन उभी केली. निर्जळ भाग असल्यामुळे घटनास्थळी न सी सी टिव्ही न कुठले तांत्रिक विश्लेषण. खरा कस लागणाऱ्या या केस मध्ये पोलिसांनी ३ आरोपींना जेरबंद केलं.

संतापजनक! स्कूल व्हॅनमध्ये 2 चिमुरडींवर अत्याचार

लहान मुलींवर अत्याचार झालेले बदलापूर प्रकरण ताजे असताना पुण्यामध्ये देखील असाच संतापजनक प्रकार घडला. वानवडी भागातील एका नामांकित शाळेतील 8 वर्षांच्या दोन मुलींवर व्हॅनमध्ये व्हॅन चालकाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना आणि पुणे शहर अक्षरशः पेटलं. सर्व स्तरातून टीका झाली, इतकंच काय तर काही तरुणांनी तर पोलीस ठाण्याच्या आवारात उभी केलेली ती बस फोडली. पोलिसांनी चालकाला अटक केली मात्र या घटनेमुळे विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या स्कूल बसच्या नियमांच्या उल्लघंनाचा प्रश्न देखील समोर आला.

हातावर पोट असलेल्या कामगारांची ती काळरात्र

पुण्यातील वाघोली परिसरात एका फुटपाथ वर झोपलेल्या ९ कामगारांना एका मद्यधुंद अवस्थेत भरधाव चालवत असलेल्या डंपर चालकाने चिरडलं. या अपघातात ९ जणांपैकी ३ जणांचा मृत्यू झाला ज्यामध्ये एक अवघ्या १ वर्षाची मुलगी आणि २ वर्षांचा चिमुरडा होता. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत पोलिसांनी डंपर चालकाला तात्काळ अटक केली. अमरावती वरून पुण्यात पोट भरण्यासाठी आलेल्या एका कुटुंबावर काळाने घाला घातला.

भाजप आमदार यांच्या मामाची हत्या

२०२४ अंती भाजप चे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांची हत्या करण्यात आली. ९ डिसेंबर रोजी मॉर्निंग वॉक साठी गेलेल्या सतीश वाघ यांचे अपहरण करून त्यांचा खून करून मृतदेह टाकून देण्यात आला. तपासाअंती हा खून सतीश वाघ यांच्या पत्नी मोहिनी वाघ यांनी केल्याचे निष्पन्न झाले. पतीच्या जाचाला कंटाळून मित्राच्या मदतीने ५ लाख रुपयांची सुपारी देत मोहिनी ने हे षडयंत्र रचलं होतं. अनैतिक संबंधाला कुठली ही थारा नसते हे या क्रूर घटनेतून अधोरेखित झालं.

पुणे शहराचा विस्तार चहू बाजूंनी होतोय. शहर पोलिस दलातील अख्यारीत आता आणखी ७ पोलीस ठाण्यांची वाढ झाली असल्यामुळे आता पुणे शहरात ३७ पोलीस ठाणे कार्यरत आहेत. पोलिस प्रशासनाच्या क्राईम डायरीमध्ये गुन्ह्यांची वाढती नोंद हे आव्हान फक्त सरकारला नाही तर सामान्य माणूस म्हणून आपल्याला सुद्धा आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT