प्रताप सरनाईक - उद्धव ठाकरे
प्रताप सरनाईक - उद्धव ठाकरे - Saam TV
मुख्य बातम्या

प्रताप सरनाईकांचा उद्धव ठाकरेंवर 'लेटर बाँब'

सुमित सावंत

मुंबई : पुढील वर्षी मुंबई, ठाणे व अन्य महापालिकांच्या निवडणुका आहेत. आतापर्यंत राज्यात भाजपशी असलेली आपली युती तुटली असली तरी युतीच्या नेत्यांचे वैयक्तिक संबंध, जिव्हाळा अनेक नेत्यांमध्ये तसाच आहे. ते अजून तुटण्याआधी जुळवून घेतलेले बरे होईल. तर त्याचा फायदा आमच्या सारख्या काही कार्यकर्त्यांना व शिवसेनेला भविष्यात होईल असे मला वाटते, असे सांगत ठाण्याचे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर लेटर बाँब टाकला आहे.

गेली काही महिने सरनाईक यांच्यावर ईडीची टांगती तलवार आहे. त्या पार्श्वभूमीवर सरनाईक यांनी हे पत्र लिहिले आहे. या पत्रात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून केलेल्या कामाचे कौतुक केले आहे. मात्र, याच पत्रात त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या हेतुबद्दल शंका व्यक्त केली आहे.

एकीकडे आपण राजकारण बाजूला ठेऊन फक्त आणि फक्त आपल्या मुख्यमंत्री पदाला प्रामाणिकपणे न्याय देत आहात. तर दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीमुळे शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला असे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या लोकांना वाटत आहे. त्यात काँग्रेस पक्ष "एकला चलो रे" ची भूमिका घेत आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या पक्षाचे नेते कार्यकर्ते फोडण्यापेक्षा शिवसेनेचे नेते कार्यकर्ते फोडत असल्याचे चित्र दिसत आहे,'' असे सरनाईक यांनी पत्रात म्हटले आहे.

हे देखिल पहा

''महाविकास आघाडीतील काही मंत्री व काही सनदी अधिकारी केंद्रीय तपास यंत्रणेचा ससेमिरा आपल्या पाठीमागे लागू नये म्हणून केंद्रातील सत्ताधारी पक्षासह आपल्या नकळत छुपी हातमिळवणी करीत आहेत हेही आपल्या निदर्शनास आणून देत आहे.

त्याचबरोबर गेल्या दीड वर्षात आपल्या पक्षाच्या अनेक आमदारांशी मी चर्चा केल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांची कामे झटपट होतात, मात्र आपला मुख्यमंत्री असूनही शिवसेना आमदारांची कामे होत नाहीत, अशी काही आमदारांची अंतर्गत नाराजी आहे. एका विशिष्ट परिस्थितीत राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाली. भाजपशी युती तोडून शिवसेना पक्षाने, काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठे करण्यासाठी महाविकास आघाडी" स्थापन केली की काय? अशी चर्चा आहे,'' असाही बाँबगोळा प्रताप सरनाईक यांनी टाकला आहे.

''मराठा व ओबीसी आरक्षण तसेच महाराष्ट्रातील महत्वाच्या प्रश्नासंदर्भात जून रोजी आपण नवी दिल्लीत पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील प्रश्न सोडविण्याबाबत पुढाकार घेतला त्याबद्दलही मनःपूर्वक अभिनंदन. त्या बैठकीनंतर आपण मा. मोदीजी यांच्यासोबत अर्धा तास खासगीत चर्चा केल्याचे वृत्त दाखवले जात आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्यात शिवसेना-भाजप तसेच सर्व पक्षीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत,'' असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

या पत्रात सरनाईक पुढे म्हणतात...."महाराष्ट्र राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री बसविणार हा वंदनीय शिवसेनाप्रमुख माननीय श्री. बाळासाहेबांना दिलेला शब्द व त्यांना दिलेले वचन पूर्ण झालेले आहे. आपण या पदाला न्याय दिला आहे व देत आहात. पण या परिस्थितीतही जे राजकारण सुरु आहे त्यात सत्तेत एकत्र राहून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आपलेच कार्यकर्ते फोडत असेल, आपला पक्ष कमकुवत करत असेल तर या स्थितीत पुन्हा एकदा आपण पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्र मोदीजी यांच्याशी जुळवून घेतलेले बरे, असे वैयक्तिक मत आहे. निदान यामुळे प्रताप सरनाईक, अनिल परब, रवींद्र वायकर या आपल्या सहकाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना होणारा नाहक त्रास तरी थांबेल अशी अनेक कार्यकर्त्यांची भावना आहे,''

भाजपचे माजी खासदार किरिट सोमय्या यांनी प्रताप सरनाईक व मंत्री अनिल परब या शिवसेना नेत्यांना टार्गेट केले आहे. त्याबाबतही सरनाईक यांनी पत्रात खंत व्यक्त केली आहे. "कोणताही गुन्हा किंवा चूक नसताना केंद्रीय तपास यंत्रणांकडून आम्हाला नाहक त्रास सुरु आहे. केंद्रीय तपास यंत्रणेचा दलाल व शिवसेनेमुळे "माजी खासदार" झालेल्या नेत्याकडून जी बदनामी सुरु आहे त्यालाही कुठे तरी आळा बसेल. आम्हाला टार्गेट करीत असताना आमच्या कुटुंबियांवर सुध्दा सतत आघात होत आहेत, खोटे आरोप होत आहेत. एका केसमधून जामीन मिळाला की तात्काळ जाणीवपूर्वक दुसऱ्या केसमध्ये गुंतवणे, त्यातून बाहेर आलो की तिसऱ्या केसमध्ये गुंतवणे अशा प्रकारचे जाणीवपूर्वक काम या तपास यंत्रणा करीत आहेत. आपल्या एका निर्णयामुळे हे कुठेतरी थांबेल,'' असे सरनाईक यांनी म्हटले आहे.

Edited By - Amit Golwalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Satara Lok Sabha Votting Live: श्रीनिवास पाटलांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

Baramati lok Sabha : शरद पवारांनी बजावला मतदानाचा हक्क; १० वर्षांनी मुंबई ऐवजी बारामतीत केलं मतदान, Video

Brazil Flood: ब्राझीलमध्ये पावसाचा हाहाकार... ५७ हून अधिक मृत्यू; हजारो नागरिक बेपत्ता

Dharashiv Loksabha Election : रितेश देशमुख आणि जेनिलिया देशमुखने बजावला मतदानाचा हक्क, लातूरमध्ये सहकुटुंब केलं मतदान

नागपूर शहरात सलग तीन दिवस भूकंपाच्या धक्क्याची नोंद, अफवांवर विश्वास ठेवू नका : भूगर्भ वैज्ञानिक सर्वेक्षण विभाग

SCROLL FOR NEXT