संजय राठोड, साम टीव्ही
यवतमाळ : एखाद्या चित्रपटातील कहानीसारखी घटना यवतमाळच्या आर्णी शहरात काल शनिवारी रात्रीच्या दरम्यान घडली. दोन वर्षांपूर्वी घडलेल्या प्रकरणातील आरोपी ओम बुटलेवर तलवारीने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ओम बुटलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याच्या मृतदेहाचं यवतमाळ येथे शवविच्छेदन करण्यात आलं. त्यानंतर ओम बुटले याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र, कालच्या प्राणघातक हल्ल्याने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. या घटनेत अवधूत सूर्यभान तिगलवाड (वय ५२), अक्षय अवधूत तिगलवाड (वय २५), रवी दत्तात्रय गुंडेवाड (वय २३), अर्जुन मोतीराम पोयाम (वय २३), देवानंद सुभाष मरुडवाड (वय २३) वर्ष आणि उमेश प्रल्हाद काळे (वय २४) असं पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
दोन वर्षापूर्वी आर्णी शहरात दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीत क्षुल्लक कारणावरून ओम बुटले आणि दत्ता वानखेडे यांनी अजय अवधूत तिघलवाड (वय २२) या युवकाचा खून केल्याची घटना घडली होती. सध्या दत्ता वानखडे खुनाच्या घटनेत अजूनही कारागृहात आहे. घटनेत मुलाला गमावलेल्या बापाच्या मनात आधी पासूनच खदखद होती. अशात मृतक ओम बुटले पंधरादिवसा आधी कारागृहातून जामिनावर बाहेर आला. ओमला बहुतेक आपल्याला जीवाने मारणार याची जाणीव झाल्याने पत्नीला आणि बाळाला सोबत घेऊन पुण्याला काम करण्यासाठी ट्रॅव्हल्सने जाण्याच्या तयारीत होता. तेवढ्यात त्याला हल्लेखोरांनी तलवार आणि चाकूने सपासप वार करून गंभीर जखमी केले. आरोपींच्या तावडीतून पळून जाण्याचा प्रयत्न ओम याने केला. मात्र, त्याला कसली तर ठोकर लागली आणि तो खाली पडला, त्याच्यावर सपासप वार करण्यात आले. त्यामुळे रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या ओम बुटलेची पत्नीने आरडाओरड केल्यानंतर रस्त्यांवरील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत गंभीर ओमला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी रवाना करण्यात आलं. पण उपचारादरम्यान ओम बुटलेचा मृत्यू झाला.
अजय अवधूत तिगलवाड या एकुलत्या एका मुलाचे काही कारण नसताना हकनाक बळी घेतला याची खंत मृतक अजय याचे वडील अवधूत तिगलवाड यांना होती. मुलाच्या मारेकर्याला कोणत्याही परिस्थितीत सोडायचे नाही या मानसिकतेतून अवधूत तिगलवाड ओमच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवून होते. शनिवारी पुण्याला जाण्यासाठी ट्रॅव्हल्सची वाट पाहताना त्याच दरम्यान अवधूत तिगलवाड यांच्यासह पाच जणांनी ओम बुटलेवर प्राणघात हल्ला केला. विशेष म्हणजे ज्या परिसरात ओम बुटले आणि त्याच्या साथीदाराने अजय तिघलवाड याला मारलं होतं. त्याच परिसरात ओम बुटलेवर प्राणघातक हल्ला करण्यात आला.
पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सहा आरोपींना अटक केली आहे. न्यायालयाने या आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. आरोपींच्या चौकशीतून पुढे येणारी माहिती महत्त्वाची ठरणार असून अजून आरोपींच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. पोलिसांना या घटनेतील सीसीटीव्ही फुटेज हाती लागल्यास तपासला वेग येणार आहे. संपूर्ण शहरात या घटनेबाबत भीतीचं आणि संतापाचं वातावरण आहे. पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. या प्रकरणातील आणखी काही धागेदोरे मिळवण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.